| अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या शिंदे आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात आदिती तटकरेही होत्या. त्यामुळे आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले हे देखील या पालकमंत्रिपदावर आला हक्क सांगत आहेत.
मात्र एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखतीत अदिती तटकरे यांच्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे. “अदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही? असं संतप्त विधान गोगावले यांनी केलं आहे.
भरत गोगावले यांच्या वक्तव्याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. भरत गोगावले यांनी महिला पुरुष असा फरक करु नये, असं त्या म्हणाल्या. भरत गोगावलेंचाही त्याग आहे. त्यांच्या विषयी मला सहानुभूती आहे, असा उपरोधिक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.