खांदा वसाहतीमधील रस्त्यांचा पुन्हा बोजवारा

दोन महिन्यांतच उखडले डांबरी पॅचवर्क

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

खांदा वसाहतीतील विविध सेक्टरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. दोन ते चार महिन्यांपूर्वी पनवेल महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आलेले डांबरी पॅचवर्क पहिल्याच पावसात उखडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत असून अपघाताचा धोका अधिक गंभीर होत आहे.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तात्पुरते पॅचवर्क केले जाते, मात्र ते काही महिनेसुद्धा टिकत नाही. सार्वजनिक निधी खर्च करूनही दर्जेदार आणि टिकाऊ काम होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

महापालिकेने तातडीने खड्डे बुजवून रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version