| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 2015-16 साली श्रीवर्धन नगरपरिषदेचे सार्वजनिक शौचालय आणि स्नानगृह बांधण्यात आले होते. परंतु, कंत्राटदार अभावी ते दोन वर्षे बंद अवस्थेत आहे. सद्यस्थितीत वापर नसलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीचा वापर पर्यटक हे उरले सुरले खाद्यपदार्थ आणि रिकाम्या बाटल्या टाकण्यासाठी करताना दिसत आहेत.
श्रीवर्धन नगरपरिषद मार्फत मठाचा गवंड व शासकीय विश्रामगृह नजीकच्या आवारात समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सार्वजनिक शौचालय, स्नानगृह व कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली अशी अल्प शुल्कात व्यवस्था करण्यात आली होती. हे शौचालय कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी देण्यात आले आहे. त्यापैकी मठाचा गवंड येथील सार्वजनिक शौचालय आणि स्नानगृहाचे कंत्राट घेण्यास कोणीच उत्सुक नसल्याने हे सुलभ शौचालय व स्नानगृह बंद अवस्थेत आहे. समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या बघता मठाचा गवंड येथील सुलभ शौचालय सुरू होणे गरजेचे होते. परंतु, दोन वर्षे ते बंद अवस्थेत असल्यामुळे पर्यटकांनी त्याची कचरा पेटी केली आहे. या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या व अंतर्वस्त्रे आढळून येतात. तर, काही समाजकंटकांनी बेसीन, शौचालय व स्नानगृहाच्या दरवाजांची नासधूस केली आहे. त्यामुळे आलेल्या पर्यटकांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली असून ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि शालेय सहलीच्या विद्यार्थिनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या शौचालयाची दुरवस्था
