हिरवे गुरुजी चौकातील स्मारकाची दुरवस्था

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल शहरात स्वच्छ आणि सुंदर पनवेल अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांसाठी शहरात ठिकठिकाणी लावले जाणारे झेंडे कार्यक्रम संपल्यानंतरही तसेच राहात असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेलमधील हिरवे गुरुजी चौकातील स्मारक परिसरातही झेंडे लावण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ते हटविण्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यातच स्मारकाच्या वरच्या लादीचीही अवस्था बिकट झाली असून, ती निघालेली दिसत आहे. यावर सैनिकांची नावे लिहलेली आहेत. याच ठिकाणी दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. त्यामुळे ऐतिहासिक व सार्वजनिक महत्त्व असलेल्या या स्मारकाची देखभाल आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. एका बाजूला स्वच्छतेचे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कार्यक्रमानंतर झेंडे व इतर साहित्य तसेच सोडून द्यायचे, अशा प्रकारांमुळे स्वच्छता अभियानाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित राजकीय पक्षांनी कार्यक्रमानंतर झेंडे हटवावेत, तर महापालिकेने स्मारकाची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version