। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्या शाळा क्र. 2 ला हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय असे जे नाव आहे. तेच नाव पनवेल महानगरपालिकेतर्फे कन्या शाळेच्या जागेवर तयार केलेल्या शाळेला देण्यात यावे, जेणेकरून यापूर्वी जे विद्यार्थी हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयात शिकत होते आणि ते शाळा सोडल्याचा दाखला घेऊन शाळा सोडून गेले आहेत त्यांना भविष्यात तांत्रिक अडचणी येऊ नयेत त्यामुळे पनवेल मनपातर्फे बांधण्यात आलेल्या शाळेला आत्ता आहे तेच म्हणजेच ’हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय’ हे नाव देण्याची मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना तसेच हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे उत्तराधिकारी अॅड. नागेश अरविंद हिरवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे.
पनवेल महापालिका शिक्षण विभागाच्या कन्या शाळा क्र. 3 येथील जागेवर शाळेसाठीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या इमारतीमध्ये सरस्वती विद्यामंदिर, हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय आणि कन्या शाळा, अशा तीन शाळांचे एकत्रीकरण करून त्यांचे एकाच शाळेमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच यावर्षीपासून याठिकाणी पनवेल महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा देखील सुरू करण्यात येणार आहे. तीन शाळांचे एकाच शाळेमध्ये एकत्रीकरण होऊन नव्याने निर्माण होणार्या मराठी माध्यमाच्या व प्रस्तावित इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी नुकत्याच झालेल्या महासभेत दि. बा. पाटील मराठी माध्यम शाळा आणि दि. बा. पाटील इंग्रजी माध्यम शाळा हे नाव मंजूर करण्यात आले आहे. महानगरपालिकेतर्फे हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नाव डावलण्यात आले आहे. या शाळेला हु. हिरवे गुरुजींचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. कारण शाळेला हु. हिरवे गुरुजी यांचे नाव दिल्यास यापुढेही त्यांच्या स्मृती समस्त पनवेलकरांच्या मनात अशाच जागृत राहतील आणि पनवेल महानगरपालिके तर्फे हु. हिरवे गुरुजी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल. महानगरपालिकेने समस्त स्वातंत्र्यसैनिकांचा नेहमीच सन्मान केला आहे व करत आहे, असेही अॅड. हिरवे यांनी म्हटले आहे. दि. बा. पाटीलाच्या नावाला आमचा कधीच विरोध नाही.
महापालिका नव्याने निर्माण करीत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लोकनेते दि.बांचे नाव जरूर द्यावे. परंतु ज्या तीन शाळांचे एकत्रीकरण होणार आहे त्या शाळेला पूर्वीचेच म्हणजेच हु. हिरवे गुरुजींचे नाव कायम राहावे. म्हणजेच याठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळेला हु. हिरवे गुरुजी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय असे नाव राहावे. एकवेळ नवीन शाळेला नवीन नाव दिले तर वावगे नाही परंतु जे जुन्या शाळेचे नाव आहे ते पुसून नवीन नाव देऊ नये, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा ईशारा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना तसेच अॅड. हिरवे यांनी दिला आहे.