मोरा जेट्टीची ‌‘जीवघेणी‌’ वाट!

तुटलेल्या लाद्या, मोडकळीस आलेले कठडे अन्‌‍‍ जाळ्यांचे अतिक्रमण

| उरण | प्रतिनिधी |

मोरा-मुंबई जलप्रवासासाठी दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असलेल्या मोरा प्रवासी जेट्टीची दुरवस्था प्रवाशांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील लाद्या उखडल्या असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरक्षेसाठी उभारलेले कठडेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यातच कठड्यांवर दोन्ही बाजूंना मासेमारीची जाळी ठेवण्यात आल्याने प्रवाशांच्या ये-जा करण्याचा मार्ग आणखी अरुंद झाला आहे. जाळ्यांमध्ये पाय अडकून प्रवासी पडण्याची शक्यता असतानाही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवेही नादुरुस्त असल्याने संध्याकाळनंतर संपूर्ण परिसरात अंधार पसरतो. एकीकडे तुटलेल्या लाद्या आणि कठडे, दुसरीकडे मार्गावर पसरलेली मासेमारीची जाळी आणि त्यात भर म्हणजे अंधारप्रवाशांनी सुरक्षितपणे जावे तरी कसे? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून मोरा जेट्टीच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम जुलै 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांना आणखी वर्षभर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाची मुदत न पाहता सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बाबी तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे.

मोरा-मुंबई जलप्रवासासाठी आम्हाला यावे लागते. सध्या या जेट्टीवरून चालणेच धोकादायक झाले आहे. दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे, मात्र ते लवकरात लवकर पूर्ण करावे.

सुजित पाटील,
प्रवास

मोरा जेट्टीच्या मजबुतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. निविदेनुसार हे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मोरा जेट्टी पूर्णपणे नवी करण्यात येणार असून, केवळ मजबुतीकरणच नव्हे तर जेट्टीवरील मार्ग, वीज आदी कामांचाही समावेश आहे.

अजय यादव,
अभियंता, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
Exit mobile version