मित्र पक्षांच्या बैठकीत ठरणार प्रचाराची दिशा

| कर्जत | वार्ताहर |

मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांनी ही निवडणूक लढविताना एकत्रित प्रचार केला पाहिजे. 10 एप्रिल रोजी सर्व मित्र पक्षांची आढावा बैठक होणार आहे. त्यावेळी प्रचाराची दिशा ठरविण्यात येईल. इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांनी नियोजनबद्ध काम केल्यास आपल्या उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे. असा विश्‍वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय गवळी यांनी व्यक्त केला.

शिवालय कार्यालयात इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय गवळी, प्रदेश प्रतिनिधी मुकेश सुर्वे, शहर अध्यक्ष अनंत देवळे, नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक, माजी शहर अध्यक्ष पुंडलिक भोईर, सचिव सुभाष मदन, दिनानाथ देशमुख, नेरळ शहर महिला अध्यक्ष नंदा सोनटक्के, दीपाली पाटील, गोपीनाथ देशमुख, गणपत झुगरे, दिनेश पाटील, संतोष म्हसकर, मनेष राणे, खंडू गावंडा, सूरज पंडित, संतोष सुरवसे आदी उपस्थित होते.

दीनानाथ देशमुख यांनी पक्षाने सारे काही देऊनही पक्षातील नेते पक्ष सोडून गेले. परंतु कार्यकर्ते जागेवरच आहेत. तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद वार्डात जाऊन कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे. त्यांच्या चारशे पार घोषणेपेक्षा उद्धव ठाकरे यांची भाजपा तडीपार ही घोषणा लोकांना भावत आहे असे स्पष्ट केले. सुभाष मदन यांनी, सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. त्यासाठी नियोजन महत्वाचे आहे असे सूचित केले. मनेश राणे यांनी, निवडणुकी नंतरसुद्धा इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे असे सांगितले. संजय गवळी यांनी, आम्ही इंडिया आघाडीच्या उमेदवाराचे इमाने इतबारे काम करणारच आहोत. मात्र नंतर सुद्धा आम्हाला विश्‍वासात घेऊन विविध स्तरावर आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे गरजेचे आहे. आपण नियोजनबद्ध निवडणूक लढविल्यास विजय आपलाच होईल असा विश्‍वास व्यक्त केला.

तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी आपण इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी विचार विनिमय करून प्रचाराची दिशा ठरवली पाहिजे. तुम्ही सुद्धा त्यासाठी काही सूचना कराव्यात. म्हणजे इंडिया आघाडीतील अन्य पक्षानं बाजूला ठेवून फक्त आम्हीच सर्व ठरवतो. असे कुणी म्हणायला नको. आपली ही अस्तित्वाची लढाई आहे. ती एकत्रित व नियोजन करून लढल्यास यश निश्‍चत मिळेल. संजोग वाघेरे पाटील हे अगदी सरळ साध्या स्वभावाचे उमेदवार आपल्याला लाभले आहेत. त्यांचा 15 व 16 एप्रिल रोजी तालुक्यात प्रचार दौरा आहे. त्यासाठी 10 एप्रिलला नियोजन बैठक आहे असे सांगितले.

Exit mobile version