‌लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची विदारक स्थिती

50 वर्षांनंतरही कालवे अपूर्ण; 267 हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट कागदावर

| माणगाव | प्रतिनिधी |

धरण बांधले, पाणीसाठा झाला, कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणारे कालवेच अपूर्ण राहिले. माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची ही विदारक स्थिती आहे. तब्बल पाच दशकांनंतरही सिंचनाचे स्वप्न अधुरे असून, 267 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात केवळ 30 हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे धरण असूनही शेती पावसाच्या भरवशावर आणि शेतकरी प्रशासनाच्या आश्वासनांवर अवलंबून आहेत.

पन्हळघर धरणाच्या योजनेला 14 एप्रिल 1972 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली, तर मार्च 1973 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जून 2008 पर्यंत धरणाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले. धरणाची लांबी 592 मीटर, उंची सुमारे 20 मीटर असून, त्याची पाणी साठवण क्षमता 3.23 दशलक्ष घनमीटर आहे. 1 जानेवारी 2018 अखेर बांधकाम आणि आस्थापनेवर मिळून 8 कोटी 93 लाख 60 हजार रुपये खर्च झाले होते. मात्र, एवढा खर्च करूनही सिंचनासाठी आवश्यक असलेली कालव्यांची व्यवस्था पूर्ण होऊ शकलेली नाही.

धरणातून डावा आणि उजवा असे दोन कालवे प्रस्तावित आहेत. डाव्या कालव्याची 3 हजार 730 मीटर लांबी असून, केवळ 1 हजार 500 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उजव्या कालव्याच्या 3 हजार 530 मीटर लांबीपैकी अवघे 900 मीटर काम झाले आहे. उर्वरित कामांसाठी सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांची गरज आहे. पुढील कामात वनखात्याच्या जमिनीचा अडथळा आणि निधीअभावी प्रकल्प रखडल्याचे सांगितले जाते.

पन्हळघर खुर्द, पन्हळघर बुद्रुक आणि अंबर्ले येथील शेतीला बारमाही पाणी मिळावे, या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, कालवेच अपूर्ण असल्याने धरणातील पाण्याचा नियोजित सिंचनासाठी पुरेसा वापर होत नाही. परिणामी, भाजीपाला, कडधान्ये आणि अन्य पिकांच्या उत्पादनवाढीची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करूनही त्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे.

या धरणामुळे मांगरूळ, अंबर्लेवाडी, लोणेरे, नवघर, उसरघर, पहेल, पाले, नवघरवाडी, खांडपाले, लाखपाले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासही मदत होऊ शकते. मात्र, त्यासाठी प्रकल्पातील पाण्याचा नियोजनबद्ध वापर आणि अपूर्ण कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. कोट्यवधींची गुंतवणूक आणि पाच दशकांचा कालावधी उलटूनही सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही. त्यामुळे उर्वरित कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करून निधी व वनखात्याच्या मंजुरीचे अडथळे दूर करावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा, पाण्याने भरलेले धरण आणि पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली शेती, हे चित्र कायम राहण्याची भीती आहे.

8.93 कोटी खर्च; सिंचन केवळ 30 हेक्टरवर!
पन्हळघर धरणासाठी 1 जानेवारी 2018 अखेर बांधकाम आणि आस्थापनेवर मिळून 8 कोटी 93 लाख 60 हजार रुपये खर्च झाले होते. मात्र, प्रकल्पातून 267 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात केवळ 30 हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळत असल्याची नोंद आहे. कोट्यवधींचा खर्च होऊनही सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झालेले नसल्याने प्रकल्पाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कालवे अपूर्ण; शेती पाण्याच्या प्रतीक्षेत
पन्हळघर धरणाचा डावा कालवा 3 हजार 730 मीटर लांबीचा असून, त्यापैकी केवळ 1 हजार 500 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उजव्या कालव्याची लांबी 3 हजार 530 मीटर असून, अवघे 900 मीटर काम झाले आहे. उर्वरित कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. वनखात्याच्या जमिनीचा अडथळा आणि निधीअभावी कामे रखडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धरणात पाणीसाठा असूनही शेतकऱ्यांना अपेक्षित सिंचनाचा लाभ मिळत नाही.
Exit mobile version