जिल्ह्याला मिळाले 681 नवीन शिक्षक

दुर्गम, अवघड क्षेत्रातील शिक्षकांचा कोटा झाला पूर्ण ; सत्यजित बडे यांनी दिले नियुक्त पत्र

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार मराठी माध्यमासाठी 635, तर उर्दु माध्यमासाठी 46 अशा एकूण 681 शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी नियुक्ती आदेश बजावले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच रायगड जिल्हा परिषदेने शिक्षकांची भरती केली आहे. अन्यथा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा शिक्षकांची उणीव भासली असती. नवनियुक्त शिक्षकांना लवकरच त्यांच्या शाळेवर हजर व्हावे लागणार आहे.

सन 2023 मधील पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया अनुषंगाने राज्यस्तरावर 16 ऑक्टोबर 2023 रोजी पवित्र प्रणालीच्या पोर्टलवर कार्यवाही सुरु करण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाईन पोर्टलवर रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद व्यवस्थापनाची मराठी माध्यम उपशिक्षक 698 पदे मराठी माध्यम पदवीधर पदासाठी 300 पदे अशी एकूण 998 पदे व उर्दू माध्यम उपशिक्षक 63 व उर्दू माध्यम पदवीधर 46 प्रमाणे एकूण 109 पदे, अशी एकूण 1107 पदांसाठी जाहिरात अंतिम करण्यात आली होती.

राज्यस्तरीय निवड प्रक्रियेनुसार रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनमध्ये 25 फेब्रुवारी 2024 रोजी उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामध्ये मराठी माध्यम उपशिक्षक 552 पदे, मराठी माध्यम पदवीधर पदासाठी 121 पदे प्रमाणे एकूण 673 पदे व उर्दू माध्यम उपशिक्षक 35 व उर्दू माध्यम पदवीधर 13 प्रमाणे एकूण 48 पदे असे एकूण 721 पात्र उमेदवार प्राप्त झाले. सदर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करुन संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. सदर कागदपत्रे पडताळणीकरिता शिक्षण विभाग (प्राथमिक) मधील अधिकारी व कर्मचारी यांचे एकूण 7 गट तयार करण्यात आले होते. कागदपत्रे पडताळणी अंतर्गत मराठी माध्यमाचे 20 उपशिक्षक व 4 पदवीधर असे एकूण 24 उमेदवार अनुपस्थित होते. तसेच एक महिला उमेदवार प्रमाणपत्र पडताळणी अंतर्गत अपात्र ठरविण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणी पूर्ण केलेल्या व पात्र ठरलेल्या अशा मराठी माध्यमाच्या एकूण 648 व उर्दू माध्यम 48 अशा एकूण 696 उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी उमेदवारांची सेवाज्येष्ठता यादी शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत तयार करुन रायगड जिल्हा परिषद संकेतस्थळावर शुकवार, (दि. 8) मार्च प्रसिध्द करण्यात आली. मराठी माध्यमाच्या एकूण 523 उपशिक्षकांची समुपदेश प्रक्रिया रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) राजेंद्र भालेराव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील भोपळे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहाय्यक प्रशासन अधिकारी तथा सहायक नियंत्रण अधिकारी संजय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन प्रक्रियेचे कामकाज पाहिले.

सदर समुपदेशन पक्रियेनुसार रायगड जिल्ह्यातील मराठी माध्यमासाठी पुढीलप्रमाणे संबंधित गटात शिक्षकांना पदस्थाना देण्यात आल्या आहेत. 
अलिबाग- 32, पेण- 70, पनवेल-11, कर्जत-08, खालापूर 09, सुधागड- 44, रोहा-82, माणगाव-21, महाड-81, पोलादपूर - 60, म्हसळा- 33, श्रीवर्धन - 41, मुरुड - 37 व तळा- 70
 तसेच जिल्ह्यातील उर्दु माध्यमासाठी पुढीलप्रमाणे संबंधित गटात शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आहेत.
 अलिबाग- 01, पनवेल- 01, कर्जत-02, सुधागड -01 रोहा- 04, महाड- 09, पोलादपूर - 01, म्हसळा- 08, श्रीवर्धन 14, मुरुड 04 व तळा- 01. विशेषतः दक्षिण रायगड पट्ट्यातील रोहा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड व तळा या गटातील रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली आहेत.
Exit mobile version