वातावरणीय बदलाचा रोडमॅप तयार: जिल्हाधिकारी किशन जावळे
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वातावरणीय बदलाला रोखणे, जनसमुदायांच्या कृतिशील सहकार्याने शाश्वत व संतुलित पर्यावरण राखणे शक्य आहे. या करीता संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासन प्राधान्याने पुढाकार घेणार आहे. वाढते प्रदूषण, निसर्गाची होत चाललेली हानी आणि त्यामुळे मानवी समुदायाचे होणारे नुकसान रोखण्याकरिता रायगड जिल्ह्याचा क्लायमेट अॅक्शन प्लान तयार करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा वातावरणातील बदल कृती आराखडा कक्ष अध्यक्ष किशन जावळे यांनी स्पष्ट केले.
वातावरणीय बदलाचे संकट 21व्या शतकातील मानव जातीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. या शतकाखेरीस पृथ्वीचे सर्वसाधारण तापमान मर्यादित ठेवण्यासाठी जगातील 195 देशांनी मान्य केलेल्या 2015 च्या पॅरिस आंतरराष्ट्रीय कराराशी भारत वचनबद्ध आहे. भारताने सादर केलेल्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानानुसार, देशाने 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन निव्वळ शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित करण्यात आलेले वातावरणीय बदलाचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथमच रायगड जिल्हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याची औपचारिक घोषणा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली आहे. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो, असर सोशल इंपॅक्ट ॲडवायसर व वातावरण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे दि.19 व 20 जानेवारी रोजी ‘नॅशनल सेमिनार ऑन लोकलायझिंग जेंडर क्लायमेट अॅक्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हिडिओद्वारे बोलत होते.
त्यानंतर याकार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक वातावरणातीला बदल कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी, सध्या होत असणारी पर्यावरणाची हाणी किंवा वातावरणात बदल ही केवळ वातावरणाशी निगडित बाब नसून तिचा पर्यावरणा सोबतच सामाजिक व आर्थिक बाबींवरही गंभीर दुष्परिणाम होणार आहे. त्याचा ताण वाढणार असल्याची वास्तविक परिस्थिती समजून घेणे व त्यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करण्याआठी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. त्याकरिता आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करणे महत्वाचे असल्याचेही मत घोरपडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीजच्या डिन डॉ. गीतांजोय साहू, रोहा वन विभागाचे उप वनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव, यशदाचे उप संचालक मल्लिनाथ कळशेट्टी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गौरी दोंड, असर संस्थेच्या संस्थापक विनुता गोपाल, आईआईएचएस सिनीयर रिसर्च असोशिएट तनुश्री दत्ता, आपटवण सरपंच अस्मिता बायकर, सामूहिक वनव्यवस्थापन समिती मजरे जांभूळपाडा सचिव सुभाष जाधव व सामूहिक वनव्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश वाघमार आदी उपस्थित होते.
जिल्हा बनवणार रोल मॉडेल
हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तयार केलेली एक सुनियोजित कृती योजना म्हणजे क्लायमेट ॲक्शन प्लॅन होय. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबईसह अनेक शहरांमध्ये यासाठी आराखडे तयार केले आहेत. राज्यामध्ये पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात जिल्हा वातावरणीय बदल कृती आराखडा होणार आहे. त्यामध्ये हवामान प्रोफाइल तयार करणे, उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवणे, अक्षय ऊर्जा वापरणे, सार्वजनिक वाहतूक सुधारणे आणि कचरा व्यवस्थापनासारख्या उपायांचा समावेश आहे. त्यामुळे शहरे तसेच जिल्हे आणि पर्यायाने सबंध महाराष्ट्र हवामान लवचिक बनणार असल्याचे व महाराष्ट्राला वातावरणीय बलदलासाठी मार्गदर्शक ठरेल. असा रोल मॉडेल आराखडा रायगड जिल्हा बनवणार असल्याचे आश्वासित मत रायगड जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.







