राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दि.5 ते दि.12 जानेवारीदरम्यान जनजागृती मोहीम
| रायगड | प्रतिनिधी |
समाजाला पोखरणाऱ्या अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग हे पूर्णतः ॲक्शन मोडवर आले असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यात ड्रग्जविरोधी व्यापक जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या मोहिमेच्या नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन रायगड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी सांगितले की, ड्रग्जविरोधातील लढा यशस्वी करायचा असेल, तर सर्व शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था तसेच समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन समन्वयाने कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. ड्रग्जचा वाढता प्रसार ही गंभीर सामाजिक समस्या असून, सामूहिक प्रयत्नांतूनच त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी माहिती देताना सांगितले की, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम राबविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, व्याख्याने व संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत ड्रग्जचे दुष्परिणाम, संबंधित कायदे व प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे पोहोचविले जाणार आहेत.
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दि. 5 ते 12 जानेवारी या कालावधीत ‘डॉन योजना’ (Drug Awareness and Wellness for a Drug Free India) अंतर्गत विशेष ड्रग्जविरोधी जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत युवक-केंद्रीत कार्यक्रमांवर विशेष भर देण्यात येणार असून, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे व संवेदनशील भागांमध्ये प्रतिज्ञा कार्यक्रम, कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे, पोस्टर-बॅनर प्रदर्शन, पथनाट्य तसेच जनसंवाद उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सध्याच्या पिढीमध्ये अमली पदार्थांचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंताजनक बाब असून, योग्य वेळी जनजागृती करणे व पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी विधी स्वयंसेवक (PLV), पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांचे सहकार्य घेण्यात येत आहे. या बैठकीस रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (महाविद्यालय विभाग) तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ड्रग्जमुक्त, सुदृढ आणि सुरक्षित रायगड घडविण्यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले.






