जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे पंधरा टन मालाची विक्री
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ना नफा, ना तोटा तत्वावर जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री केंद्रात जवऴपास 15 टन मालाची विक्री करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड झाली. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सदरचे विक्री केंद्र 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, सेक्टर 9 उलवे येथे उभारण्यात आली होती.
महागाईच्या भस्मासुराने देशातील सर्वसामान्य जनतेला गिळंकृत केलं आहे. सर्वसामान्य माणसाची दिवाळी ही एक स्वप्नच बनून राहिली असल्यामुळे सर्वसामान्य माणूस विवंचनेत सापडला आहे. दररोज वाढणार्या महागाईवर सामाजिक बांधिलकी बाळगणार्या प्रीतम म्हात्रे यांनी सदरची संकल्पना राबविली आहे आणि त्यातून पनवेलकरांनी या संकल्पनेचे स्वागत केले. गतवर्षी देखील टनावरी माल ना नफा, ना तोटा या संकल्पनेवर पनवेलमधील नागरिकांपर्यंत पोहोचला होता.
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने फराळासाठी आवश्यक रवा, साखर, मैदा या वस्तू जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना तर एकाच्या पगारावर घर चालवणे हीच गंभीर बाब बनून राहिली आहे. त्यातच दिवाळी हा सण खिशाला कात्री लावून दिवाळे काढणारा असा आख्ययित असलेला सण असला, तरी दिवाळी साजरी करणे, लक्ष्मीचे घरामध्ये स्वागत करण्यासारखे तसेच विखुरलेल्या घरांना एकत्र आणणे यासाठी दिवाळीला खास महत्व असते. मात्र काही वर्षांमध्ये झालेल्या महागाईने सर्वच जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे ना नफा ना तोटा तत्वावर जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत विक्री केंद्र उभारण्यात अली होती. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व 15 टन हुन मालाची विक्री करण्यात आली.
जे.एम.म्हात्रे ट्रस्टतर्फे नेहमीच सर्वसामान्यांचा विचार केला जातो. वाढत्या महागाईत तुटपुंज्या उत्पन्न गटातील जनतेला आधार देण्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ना नफा, ना तोटा तत्वावर विक्री केंद्रे सुरु केली. जनतेने त्या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
प्रीतम म्हात्रे,
अध्यक्ष म्हात्रे ट्रस्ट