कुत्र्यांचे निर्बीजीकरण दिखावा

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या मोहिमेला ब्रेक

| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा बसवण्यासाठी गतवर्षी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, शस्त्रक्रिया व श्वान दंश प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला. मात्र हा उपक्रम फारसा यशस्वी ठरला नाही. चेंढरे, थळ व चौल ग्रामपंचायतमध्ये हा उपक्रम राबविला. त्यानंतर ही मोहिम थांबविण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. कुत्र्यांचे हल्ल्यांमुळे नागरी सुरक्षा धोक्यात आली आहे. 2022 पासून आजपर्यंत सात हजारहून अधिक नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. त्यात दोन हजार 207 जणांना गंभीर दुखापत झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आल्याची माहित उपलब्ध झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शन घेऊन पाळीव कुत्र्यांवर उपचार केले जातात. परंतु मोकाट कुत्र्यांना काही मंडळी पाळत असतात. त्यांची देखभाल करीत असतात. मात्र त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार केले जात नाही. त्याचा परिणाम कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढली जाते. जिल्हयात ग्रामीण भागासह शहरी भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे.नाक्यानाक्यावर मासांहाराचे पदार्थ खाऊन मोकाट कुत्रे जगतात. काही ठिकाणी या कुत्र्यांना जेवण घालतात. त्यामुळे ठिकठिकाणी या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या चालकांसह शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरदेखील कुत्रे एकजूटीने हल्ला करतात. मागील वर्षी अलिबाग शहरात हा प्रकार घडला होता. आताही तीच परिस्थिती आहे. अलिबाग – रोहा मार्गासह अलिबाग – वावे मार्गावर मोकाट कुत्रे फिरत असतात. या कुत्र्यांच्या भितीने नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. मागील चार वर्षात सात हजार नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात ठिकठिकाणी कुत्र्यांचा झुंड दिसून येतो. अनेक वेळा हे कुत्रे माणसांवर एकत्रीत हल्ले करतात. त्यामुळे जीव गमविण्याची भिती अनेकांवर ओढावली आहे. काही वेळा दुचाकीवरून प्रवास करीत असताना कुत्रे अंगावर येतात. त्यामुळे अपघात होण्याची भितीदेखील असते. गावे, वाड्यांमध्ये कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नाही.त्याचा परिणाम नागरिकांना विशेष करून लहान मुलांना दहशतीच्या खाली राहवे लागत आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरू लागले आहे. यावर ठोस उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने मागील वर्षी जिल्हा परिषद सेस फंडातून 25 लाख रुपयांची तरतूद करून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, शस्त्रक्रिया व श्वान दंश प्रतिबंधक लसीकरण करण्यावर भर दिला होता. पुणे येथील युनिर्वसल ॲनिमल वेलफेअर या एजन्सीला हे काम देण्यात आले होते. 25 फेब्रुवारी 2024 पासून या कामाला सुरूवात करण्यात आली होती. यासाठी पेणमध्ये एक सेंटर उभारण्यात आले होते. मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांना त्या सेंटरमध्ये आणणे, निर्बिजीकरण, शस्त्रक्रिया करणे, त्यांची उत्पत्ती थांबविण्यासाठी व रेबीजपासून बचाव करण्यासाठी श्वान दंश प्रतिबंधित लसीकरण देण्याचे काम करण्यात आले होते. सुरुवातीला अलिबाग तालुक्यातील चेंढरे, चौल व थळ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायत हद्दीतील 207 कुत्र्यांचे निर्बिंजीकरण व लसीकरण करण्यात आले. मात्र मार्च अखेर कंपनीचा ठेका संपल्याने या मोहिमेला ब्रेक लागला.त्यामुळे फक्त बोटावर मोजण्या इतक्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोकाट कुत्र्यांचे लसीकरण निर्बिजीकरण करण्यात आले. ही मोहिम होऊन दीड वर्षे होत आली आहेत. मात्र अजूनपर्यंत जिल्हा परिषदेने ही मोहिम पूढे चालू ठेवली नाही. त्यामुळे फक्त मोहिमेचा दिखावा केल्याची चर्चा सुरु आहे.

25 हजार कुत्र्यांचे लसीकरण
कुत्र्यांच्या हल्ल्यापासून होणाऱ्या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. एप्रिल पासून आतापर्यंत 25 हजार 819 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
सात हजार जणांना चावा
रायगड जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. कुत्र्यांचे हल्ल्यांमुळे नागरी सुरक्षा धोक्यात आली आहे. 2022 पासून आजपर्यंत सात हजारहून अधिक नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. त्यात दोन हजार 207 जणांना गंभीर दुखापत झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आल्याची माहित उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी अलिबाग शहरात हा प्रकार घडला होता. आताही तीच परिस्थिती आहे. अलिबाग-रोहा मार्गासह अलिबाग-रेवदंडा या मार्गावर मोकाट कुत्रे फिरत असतात. या कुत्र्यांच्या भितीने नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. मागील चार वर्षात सात हजार नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

मागील वर्षी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, मार्चनंतर ठेका संपला. कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

डॉ. सचिन देशपांडे,
जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग

Exit mobile version