आयपीएल खेळणार्‍यांना संघाचे दरवाजे बंद

आफ्रिकन क्रिकेटपटूंना इशारा
। जोहान्सबर्ग । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिकेने नुकतेच बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका 2 – 0 अशी जिंकली. मात्र दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेपूर्वीच्या वनडे मालिकेत बांगलादेशकडून मायदेशात पराभव सहन करावा लागला. दरम्यान कसोटी मालिकेतील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने एक मोठी घोषणा केली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या आयपीएल खेळणार्‍या खेळाडूंना इशारा दिला.
डीन एल्गर म्हणाला की मला माहिती नाही की ते खेळाडू बांगलादेशविरूद्धची मालिका न खेळता आयपीएल खेळणारे पुन्हा संघात निवडले जातील का नाही. आता हे आमच्या हातात राहिले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या बर्‍याच खेळाडूंनी बांगलादेश विरूद्धची मालिका खेळण्याऐवजी आयपीएल खेळणे पसंत केले. यात कसिगो रबाडा, मार्को जेनसेन ,लुंगी निगिडी,एनरिच नॉर्तजे, रासी वॅन डेर ड्युसेन आणि एडिन मारक्रम यांनी आयपीएल खेळण्याला पसंती दिली. त्यांनी बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका खेळणे टाळले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापन खूष नाही. विशेष म्हणजे संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचरने देखील कर्णधाराची री ओढली आहे. तो म्हणाला की, मत्यांनी आयपीएलमध्ये जाऊन संघातील आपली जागा रिकामी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश विरूद्धचे दोन्ही कसोटी सामने आरामात जिंकले. जरी त्यांच्या संघातील रथी महारथी आयपीएलमध्ये पैसे छापत असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मात्र कसोटी मालिकेपूर्वी झालेली वनडे मालिका बांगलादेशने जिंकली होती. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेत पहिलीच वनडे मालिका जिंकली.

Exit mobile version