| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष शहराचा प्रथम नागरिक कोण होणार, याकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवार, 22 जानेवारी रोजी मंत्रालयात काढली जाणार आहे.
नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच अनेक राजकीय दिग्गजांचे महापौर होण्याचे स्वप्न अवलंबून आहे. जर एखाद्या पालिकेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आले, तर चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे. या सोडतीसाठी नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना या नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. 22 जानेवारीच्या दुपारपर्यंत राज्यातील 29 शहरांच्या महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.






