650 जणांकडून असो.च्या नावे जमीन करण्याची मागणी; रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आपल्या स्वतःचे हक्काचे घर असणार या आशेवर एका बिल्डरला करोडो रुपये दिले. परंतु, त्याने घर बांधण्यास परवडत नसल्याचे कारण दाखवून शेकडो जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह ठाणे येथील एकूण 650 जणांच्या घराचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, बिल्डरच्या ताब्यात असलेली जमीन श्रीगणेश कृपा सामाजिक असो.च्या नावे करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. त्याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पनवेल हे शहर दिवसेंदिवस अधिकच विकसित होत चालले आहे. वेगवेगळ्या सुविधा पनवेलमध्ये उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी आपले घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. मुंबईसह अलिबाग व पुण्याकडे जाण्यासाठी अगदी मध्यवर्ती ठिकाण असल्याने पनवेलमध्ये हक्काचे घर असल्याचे अनेकांचे स्वप्न आहे. परंतु, स्वप्नपूर्ती होण्याआधीच भंग झाले आहे. विक्रम सांळुखे यांच्या म्हणण्यानुसार, नवीन पनवेल येथील विकासक शरद अमृत मोझर यांनी स्वप्नपूर्ती होम्स प्रा.लि. या नावाचे स्वप्न अनेकांना दाखविले. कमी किंमतीमध्ये घर मिळणार म्हणून 2012 मध्ये अनेकांनी बुकींग केली. काहींनी 3 लाख तर काहींनी 5 लाख रुपये असे एकूण 650 जणांनी विकासकाला पैसे दिले. मात्र, ती जागा नैना अंतर्गत गेली असून तो कॉमन चाळीचा प्रकल्प होता. त्यामध्ये रस्ता, गार्डन आदी सुविधा उपलब्ध करणे होते. परंतु, परवडत नाही, असे सांगून विकासकाने स्वप्नपूर्ती होम्स बांधण्याच्या कामाला ब्रेक दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. मात्र, अजूनपर्यंत अनेकांना हक्काचे घर मळािले नाही. अखेर मोझर यांच्या नावे असलेली जमीन ताब्यात घेऊन स्वतःच विकास करायचा, असा निर्णय 650 जणांनी घेतला आहे. त्यासाठी श्रीगणेश कृपा सामाजिक असो.ची स्थापना करण्यात आली असल्याचे विक्रांत साळुंखे यांनी सांगितले.
दरम्यान, श्री गणेश कृपा सामाजिक असो. च्या नावे जमिन करण्यात यावी, या मागणीसाठी विक्रांत साळुंखे, संजय सावंत यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे समस्या मांडली. तसेच, निवेदन देताना ही जागा असो.च्या नावे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
स्वप्नपुर्ती होम्स प्रा.लि.च्या नावाने बूकींग केली. तो कॉमन चाळीचा प्रकल्प होता. मात्र परवडत नाही, असे सांगून त्यांनी काम थांबविले. विकासक शरद मोझर यांच्याविरोधात मोर्चे काढले. मोझर यांच्या मालकीची असलेली जमीन श्रीगणेश कृपा सामाजिक असोसिएशनच्या नावे करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच, या असोसिएशनच्या नावाने जमीन विकसीत केली जाईल.
विक्रम सांळुखे,
अध्यक्ष, श्रीगणेश कृपा सामाजिक असो.
शासनाच्या पदरी जमीन जाण्यापेक्षा 650 लोकांचे भले व्हावे, त्यांना जमीन मिळावी, अशी धारणा आहे. गोरगरींबाचे नुकसान भरून काढणे शासनाकडून झाले नाही. ती जमीन सोसायटीच्या नावाने करण्यात यावी, अशी मागणीची न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडेदेखील निवेदन दिले आहे.
ॲड. विजय शिंदे







