महिलांच्या सहभागामुळेच साध्य होणार महासत्तेचे स्वप्न- चित्रलेखा पाटील

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने उद्योजिकांचा केला सन्मान


| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात पनवेलच्या शहरी भागापासून ते पोलादपूरच्या ग्रामीण भागापर्यंत महिला बचतगटांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आर्थिक विकासाच्या चळवळीला गतिमान योगदान दिले आहे, आज जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर, आर्थिक दरडोई उत्पन्न जर वाढत असेल तर त्याचे श्रेय या महिलांनी दाखविलेल्या मेहनतीला आणि उत्साहाला आहे, गेली एक दशक मी स्वतःच्या डोळ्याने महिलांच्या या प्रगतीमध्ये स्वतः बारकाईने लक्ष देऊन पाहतेय, त्यांचे अनुभव, जिद्द आणि स्वतःला झोकून काम यशस्वीपणे करून दाखविण्याची तयारी यामुळे उद्याच्या भारताचे आर्थिक स्वप्न अधिक बळकट करणार आहे, बँकेच्या माध्यमातून ही चळवळ यशस्वी होताना आमदार जयंत पाटील यांचा दूरदृष्टीकोन आज सत्यात उतरताना पाहून आम्हाला मनसोक्त आनंद होतो की हेच विचार पुढे चालवत आम्ही हा वारसा अधिक बळकट करीत आहोत असे उदगार महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी बँकेच्या सभागृहात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने जिल्हास्तरीय बचतगटातील महिलांचा उद्योजिका सन्मान सोहळ्यामध्ये आपले मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे, बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका आणि मयूर बेकरीच्या संस्थापिका विद्या पाटील, बँकेच्या संचालिका प्रीता चौलकर, मधुरा मलुष्टे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक गटांचा व्यवसायातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

नाबार्डने बचतगट ही संकल्पना नव्वदीच्या दशकात आणली आणि त्यानंतर जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून ही चळवळ म्हणून उभी राहिली, बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपाचे एनजीओची मदत न घेताना बँकेने आज हे बचतगट स्थापन केले आहेत, तसेच यांना आर्थिक स्वरुपात फायदा मिळण्यासाठी कर्जसुविधा, प्रशिक्षण आणि सकारात्म्क पाठिंबा दिला आहे, हे बचतगट आपले व्यवसाय सक्षमपणे उभारत आहेत, तसेच आर्थिक उत्पन्न कमवित आहेत याबद्दल बँकेचा चेअरमन या नात्याने मला आनंद आणि समाधान वाटतो असे उदगार कार्यक्रमाच्या सुरूवातीला आमदार जयंत पाटील यांच्यावतीने काढण्यात आले. बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या आजवरच्या प्रगतीमध्ये बचतगट ही केवळ एक संकल्पना न राहता आर्थिक विकासाची चळवळ म्हणून उभी राहिली आहे याबाबत भाष्य केले तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारून या महिलांना विकसित प्रशिक्षणांच्या माध्यमातून जोडण्याविषयी मान्यवरांना आणि बँकेला आवाहन आवाहन केले.



कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक या नात्याने मयूर बेकरीच्या संस्थापिका विद्या पाटील यांनी व्यवसाय उभारणी मधील सातत्य आणि गुणवत्ता याविषयी मार्गदर्शन केले, तसेच जुने आणि नवीन विचार एकत्र आणून त्यामधून सुवर्णमध्य गाठणे हे महिलेला शक्य असते फक्त त्याकरिता चिकाटी आणि जिद्द मनामध्ये असणे किती महत्त्वाचे असते याबाबत देखील मार्गदर्शन केले. नाबार्डच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे यांनी आपल्या मनोगतात नाबार्डच्या उपक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी दिलेल्या प्रतिसादाला धन्यवाद दिले तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आपल्या मनोगतात बँकेने 5000 कोटींचा व्यवसाय टप्पा ओलांडताना मायक्रो लेडिंगमुळे व्यवसायामध्ये झालेली प्रगती तसेच बचतगटांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बँकेची निर्माण होणारी ओळख याबाबत मत व्यक्त केले,शिवाय बँकेच्या प्रगतीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान आणि सहभाग यांचे विशेष कौतुक केले. तसेच भविष्यात बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँक 10,000 कोटींच्या व्यवसायाकडे जाण्यासाठी सक्षम आहे याबाबत उपस्थितांना आश्वासित केले.

या कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील 400 पेक्षा अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदविला, तसेच महिला दिनाचा कार्यक्रम बँकेमध्ये सातत्याने साजरा केला जातोय त्याबद्दल आभार ही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे सिनियर मॅनेजर संदीप जगे तर आभार प्रदर्शन बँकेच्या प्रशासन विभागाचे डेप्युटी चीफ मॅनेजर संदेश पाटील यांनी केले. यावेळी बँकेचे केंद्र कार्यलयातील अधिकारी तथा अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version