कोल्हारे ग्रामस्थांकडून राजिपच्या सीईओंना निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास प्राधिकरणामार्फत तीन ग्रामपंचायतींसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा उद्देश होता. मात्र, सध्या या प्रकल्पाचा वापर केवळ नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात येत असून, जमा होणाऱ्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जात आहे. यामुळे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असून, तथा आगीतून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुरामुळे कोल्हारे, धामोते, बोपेले तसेच उल्हास नदीपलीकडील परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुरामुळे श्वसनाचे विकार व इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हार ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी पुढाकार घेत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन डम्पिंग ग्राऊंड तातडीने बंद करावे किंवा अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी केली आहे. यावेळी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भातील निवेदनही सीईओंना देण्यात आले.
डम्पिंग ग्राऊंडमध्ये संध्याकाळच्या वेळेस कचरा जाळला जात असल्याचे प्रकार घडत असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात सरपंच महेश विरले यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांना कचरा जाळण्यास मनाई करण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरत्या उपाययोजनेंतर्गत कचरा खड्डा करुन त्यात टाकण्यात येत असला, तरी कायमस्वरुपी उपाय म्हणून डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, डम्पिंगमधील कचऱ्याला आग नेमकी कशामुळे लागते, की ती जाणीवपूर्वक लावली जाते, याचा तपास करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत पोलिसांकडेही लेखी तक्रार देण्यात आली आहे.
धामोते हद्दीतील मॉर्निंग सोसायटीजवळील नाल्यालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर धुराचा त्रास होत असून, याबाबत ग्रामस्नीि कोल्हारे ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत सरंपच महेश विरले, रोशन संजय म्हसकर, सोमनाथ विरले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांच्यासमवेत प्रत्यक्ष डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करण्यात आली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. नेरळ विकास प्राधिकरणाकडून कचऱ्यावर कोणतीही शास्त्रीय प्रक्रिया न केल्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.







