चौलमधील महायुतीच्या नेत्याचे कानशील फोडले?

आमदारांच्या पत्नीने थोबडल्याची जोरदार चर्चा

| अलिबाग | वार्ताहर |

विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र जोरात सुरू असून, अंतिम टप्प्यातील प्रचारही शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा झंझावात सुरू असताना, आमदारांच्या पत्नीने चौलमध्ये राजकीय प्रस्थ निर्माण करुन महायुतीचा बडा नेता असा दावा करणार्‍याच्या कानशिलात लगावल्याची जोरदार चर्चा चौल पंचक्रोशीत सुरू आहे.

चौल विभागात महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराचा झंझावात जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेत प्रचार करीत आहेत. चित्रलेखा पाटील यांना संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चौल ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाची सत्ता असून, त्यांच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे चिऊताईंना चौल विभागातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. असे असताना शिवसेना शिंदे गटाकडून विकासकामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. पाच वर्षात आमदारांनी चौलमध्ये काहीच विकासाची कामे केलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाने प्रचारासाठी जाणार्‍या महायुतीच्या कार्यकर्त्यांना मतदार जाब विचारत आहेत. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचारासाठी जाण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आहे. कामेच केली नसल्याने मतदारांना काय उत्तर देणार, अशी पंचाईत महायुतीच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यातच मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहायला लागल्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करीत आपणच या मतदारसंघात विकास केल्याचे महायुतीकडून सांगण्यात येत होते. त्या बॅनवरदेखील या नेत्याचे फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, बॅनरबाजी करुन लोकांची फसवणूक करणार्‍या महायुतीच्या नेत्याविरोधात आधीच मतदारांमध्ये संतापाची भावना आहे.

बॅनरबाजी करुन फुकटचे श्रेय घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मतदार आता जाब विचारत आहेत. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचारापासून लांबच असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती आमदारांना कळल्यानंतर आमदार पत्नीने जाब विचारण्यासाठी चौलमधील महायुतीच्या नेत्याच्या ऑफिसमध्ये जात त्याला याबाबतचा जाब विचारत त्याच्या कानशिलात मारल्याची जोरदार चर्चा चौलमध्ये रंगली आहे. त्यामुळे आमदारांच्या पत्नीकडून मार खाणारा हा नेता कोण, अशी चर्चा सध्या मतदारांमध्ये रंगली असून, या नेत्याबद्दल छि.. थू.. व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version