प्लास्टिक व्यवस्थापनाचा सोप्पा मार्ग

Used plastic bottles are seen at a waste collection point in Tokyo, Japan November 21, 2018. REUTERS/Toru Hanai

शाळा व घराघरांत जनजागृती

| सुधागड-पाली । वार्ताहर।

प्लास्टिक व्यवस्थापनाचा सोप्पा व अनोखा मार्ग सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्लास्टिकचे व्यवस्थापन आणि वापराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात शाळा व घरांत हा उपक्रम व जनजागृती करण्यात येत आहे.

सरकारने प्लास्टिक बंदी आणली, दंड ठोठावले मात्र तरीही प्लास्टिक वापर सुरूच आहे. शिवाय वेफर्स, चॉकलेट व इतर पदार्थांची वेस्टने यावर कोणतेच नियंत्रण नाही. परिणामी तेही डोकेदुखी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील काही शाळेतील विद्यार्थी हे मुख्याध्यापक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक पिशव्या, चॉकलेट, वेफर्स व इतर पदार्थांची वेस्टने जमवून ती प्लास्टिकच्या बाटलीत भरण्याचा पर्यावरणस्नेही उपक्रम राबवित आहेत. प्रोत्साहन पर बक्षीस मिळाल्याने या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, उतेखोल-माणगाव, पालीतील ग. बा. वडेर हायस्कूल व व. ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय, तसेच जांभुपाडा आत्मोन्नती विद्यालय येथे मागील तीन वर्षांपासून हा अनोखा पर्यावरणस्नेही उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात प्लास्टिक पिशव्या, वेष्टनांनी भरलेली बाटली आणणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येक बाटलीमागे काही चॉकलेट प्रोत्साहन पर दिले जात आहेत. या उपक्रमामुळे प्लास्टिक समस्या मार्गी लागली आहे. शाळा, घर व सभोवतालचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत देखील होत आहे. मानवी जीवनात प्लास्टिकचा वापर अनिवार्य झाला आहे.

प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिकच्या पिशव्या येतातच. या पिशव्या व वेष्टन कचर्‍यामध्ये न टाकता दररोज पाण्याच्या बाटली मध्ये टाकल्या जातात. ही बाटली भरली की व्यवस्थित झाकण लावून कचर्‍यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. शिवाय पावसाळ्यात नदी नाले तुंबून पुरसदृश्य स्थिती निर्माण होणार नाही. यामुळे प्लास्टिक कचर्‍याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागते. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होते. प्लास्टिक नियोजन युक्त भारत निर्माण होईल. याबाबत समाज माध्यमांवर जनजागृती होत आहे.

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी व त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी हा उपक्रम चांगला पर्याय आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे घरोघरी देखील जनजागृती होत आहे.

अमोल जंगम, मुख्याध्यापक,
आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, उतेखोल माणगाव


कोट
 

Exit mobile version