कोल्हापूर आणि मुंबईबाबत अधिवेशनात पुरवणी मागणी मांडली जाणार; कोकण विभाग शिक्षक आ. बाळाराम पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शासनाकडून मूल्यांकन करून अनुदान मंजूर करण्यात आले होते. राज्यातील सर्व विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना शासन आदेशानुसार वेतन अनुदान निर्गमित करण्यात आले आहे; परंतु मुंबई विभाग व कोल्हापूर विभाग अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. कोल्हापूर आणि मुंबई विभागातील मूल्यांकनात पात्र झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली होती.
कोल्हापूर आणि मुंबई विभागातील पात्र झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना तात्काळ अनुदान मंजूर व्हावे, यासाठी कोकण विभाग शिक्षक आ. बाळाराम पाटील यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी दिनांक 17 जून रोजी बाळाराम पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली होती.
बुधवारी (दि.30) मुंबई आणि कोल्हापूर विभागातील पात्र झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाची तरतूद व्हावी, याबाबत पुरवणी मागणी आगामी अधिवेशनात सादर करण्यात यावी, यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि मा शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मागणी मान्य केली असून कोल्हापूर आणि मुंबई विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदान मंजूर व्हावे याबाबत पुरवणी मागणी आगामी अधिवेशनात सादर केली जाणार आहे. त्यांच्या सुचनेनुसार उपसचिव गजानन पाटील यांची भेट घेण्यात आली असून आगामी अधिवेशनात कोल्हापूर आणि मुंबई विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे, यासाठी पुरवणी मागणी आगामी अधिवेशनामध्ये मांडली जाणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.