जिल्हा कारागृहातील कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत


। अलिबाग । प्रमोद जाधव ।

अलिबागमधील जिल्हा कारागृह 82 बंद्याच्या क्षमतेचे आहे. मात्र या कारागृहात दुपट्टीपेक्षा अधिक बंदी असल्याचे समोर आले आहे. क्षमतेपेक्षा अधिक बंदी कारागृहात असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचार्‍यांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. बंद्यांना सांभाळताना कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अलिबागमधील जिल्हा कारागृह ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचा वापर वेगवेगळ्या गुन्ह्यातील बंदींना ठेवण्यासाठी केला जात आहे. आंग्रेकालीन असलेल्या 35 फुट उंचीच्या या वास्तूला संपूर्ण दगडाने विळखा घातला आहे. त्याच्या आतमध्ये बंद्यांना ठेवले जाते. अलिबागमधील जिल्हा कारागृह 82 बंद्याच्या क्षमतेचे आहे. त्यात 80 पुरुष व दोन महिला बंद्याचा समावेश आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे बंद्याची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा कारागृहात सध्या 178 बंदी आहेत. त्यामध्ये 166 पुरुष व 12 महिला बंद्याचा समावेश आहे. ज्या कारागृहात दोन महिला ठेवण्याची जागा आहे. त्याठिकाणी 12 महिला बंदी आहेत. त्यामुळे दहा बंदी कारागृहात अधिक असल्याचे समोर आले आहे. कारागृहात पुरुष 80 बंदीना मान्यता असताना 166 बंद्यांना ठेवावे लागत आहे. त्यामुळे 86 बंदी अधिक या कारागृहात आहेत. जिल्हा कारागृहात 38 मंजूर पदापैकी 27 कार्यरत आहेत. त्यात अधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तुरुंगाधिकारी, सुभेदार, हवालदार यांचा समावेश आहे. नऊ शिपाईपासून वैद्यकीय अधिकारी, परिचारिकासह 11 पदे रिक्त आहेत. कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याचा फटका कर्मचार्‍यांना बसत आहे.

कर्मचारी कमी आणि बंदी अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कैद्यांवर नजर ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही वर्षापूर्वी या कारागृहातून तुरुंगाधिकारी व अन्य कर्मचार्‍यांना चकवा देत चार बंदी पळून गेले होते. शासनाने रिक्त पदे तातडीने भरल्यास कर्मचार्‍यांचा ताण कमी होईल या बंद्यावर लक्ष ठेवण्यास कर्मचार्‍यांची मदत होणार आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

22 ते 40 वयोगटातील कैदी 80 टक्के
खून, चोरी या गुन्ह्यातील बंदी कारागृहात आहेत. खून, चोरीसारखे गुन्हे केलेले बंदी 80 टक्के आहेत. परंतु परराज्य, जिल्ह्यातील गुन्हेगारांचा यात अधिक समावेश आहे. रायगड जिल्हा शांत आहे. कारागृहात येणारे बंदी हे पर राज्यासह परजिल्ह्यातील अधिक आहेत. जिल्ह्यातील बंद्यांची संख्या कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

कारागृहात 38 मंजूर पदांपैकी 27 पदे भरली आहेत. 11 पदे रिक्त आहेत. त्यामुळे काम करताना अडचणी येतात. तरीदेखील कर्मचारी योग्य पध्दतीने काम करीत आहेत. बंद्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम येथे केले जाते.

रामचंद्र नरवरे
वरिष्ठ तुरुंगाधिकारी
जिल्हा कारागृह अलिबाग
Exit mobile version