हातगाड्या वाल्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण धोक्याचे ठरणार
| खोपोली | वार्ताहर |
खोपोली शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर हायको कॉर्नर येथे रस्त्यावरच भाजी व फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने भविष्यात या ठिकाणी गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. खोपोली पालिका प्रशासन व पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे अशी चर्चा खोपोली शहरातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. खोपोली शहरात दिवसेंदिवस हातगाडी वाल्यांची संख्या वाढतच आहे. यावर पालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे खुलेआम चर्चीले जात आहे. एकाच कुटुंबातील अनेक गाड्या वेगवेगळ्या भागात फळ व भाज्यांची विक्रीसाठी वापरल्या जातात. पूर्वी बाजारपेठेत म्हणजे विशेषता दिपक चौकाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात फळ व भाजी विक्रेत्यांच्या गाड्यांवर विक्री होत असे, यामुळे दीपक चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत असे अखेर पालिका प्रशासनाने त्या ठिकाणाहून या फळ आणि भाजी विक्रेत्यांना हलविले, परंतु प्रत्येक वेळी शहराच्या विविध भागात मोकळ्या जागेत या हातगाडी वाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
या होणाऱ्या गंभीर समस्ये बाबत पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिक करतांना दिसत आहेत. मुंबई शहरातील हातगाडी धारकांना महानगरपालिकेतर्फे परवाना दिला जातो त्या धरतीवर खोपोली नगर परिषदेने जर परवाना दिला असता तर आज हातगाडी वाल्यांची दिसणारी प्रचंड मोठी संख्या कदाचित मर्यादित राहिली असती अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. फळ व भाजी होलसेल विक्रेते हेच आपला माल संपवण्यासाठी हातगाडी विक्रेत्यांना देत असतात असा धक्कादायक प्रकार ऐकावयास मिळत आहे. अनेकदा भाजी मार्केट परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच भाजी विक्रेते आपला व्यवसाय करीत असतात, त्यामुळे ग्राहकही अधिकृत भाजी मार्केटमध्ये जाण्याचे कष्ट घेत नाहीत, परिणामी अश्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पहावयास मिळते. या विषयाबाबत अनेकदा नागरिकांकडून पालिका प्रशासनाला तसेच पोलिसांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले परंतु या विषयाबाबत दोन्ही विभागाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा सर्वसामान्य नागरिकांकडून आरोप करण्यात येत आहे. नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग करते तरी काय? असा सवाल नागरिक करीत आहेत.