। पेण । प्रतिनिधी ।
प्रेम संबंधाला घरातून विरोध होत असल्याने एक विवाहित जोडप्याने जंगलात झाडाला गळफास लावून एक दुजे के लिए या फिल्मिस्टाईल पद्धतीने त्यांनी आत्महत्या करण्याची घटना पेण तालुक्यात घडली.
पेण तालुक्यातील राजमाची येथे राहणारा परशा खालापूर येथील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याच हॉटेलमध्ये काम करणार्या पुजा नामक महिलेशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. परंतु हे प्रेमसंबंध परश्याचा बायकोला मान्य नव्हते. त्यातूनच त्यांचे खटके उडत असत. परशा हा खालापूरवरुन अधूनमधून पेण तालुक्यातील राजमाची या आपल्या मुळ गावी येत असत. कधी कधी तो पुजाला देखील घेऊन आपल्या मुळ गावी येत असे. मात्र हा प्रकार परशाच्या बायकोला मान्य नसल्याने तिने या बाईला आपल्या गावी घेऊने यायचे नाही, असे परशाला बजावले.
चार दिवसापूर्वी ही दोघे पेण तालुक्यातील राजमाची गावापासून जंगलात एक ते दीड तास अंतरावर असलेल्या वर्धानी मातेच्या मंदिराच्या परिसरात गेले. त्यानंतर पुजाच्या मोबाईलवरून फोटो पाठवले. या दरम्यात परशाच्या बायकोने हॉटेल मालकाकडे चौकशी केली. त्यावरून असे समजले की, चार दिवसापूर्वीच गावाकडे चाललोय असे सांगून तो निघून गेला आहे. तेव्हापासून हॉटेलवर आलेला नाही. मात्र फोटो मिळाल्यानंतर तो परिसर ओळखीचा दिसला आणि मग परशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वर्धानी मातेच्या मंदिराच्या शेजारी एका झाडावर एकाच साडीच्या सहाय्याने या दोघांनी आत्महत्या केल्याचे निर्दशनास आले.
खबर मिळाल्यावर पेण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक पोकळे हे करत आहेत.