स्वप्नाची समाप्ती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे जाणे म्हणजे एका स्वर्गीय अनुभूतीच्या स्वप्नातून खडतर वास्तवात येणे आहे. हे स्वप्न केवळ एका रात्रीचे नव्हे तर, सात दशकांचे होते. लता मंगेशकर यांची कारकीर्द म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सजायला लागलेली संपूर्ण भारतीयांसाठीची सांगितिक मैफल होती. ही मैफल अशीच चिरंतन सुरू राहील असे वाटत असताना, हा स्वप्नभंग झालेला आहे. त्यांच्या गाण्यांचे सूर हवेतील प्राणवायूप्रमाणे गृहीत धरलेले होते. अवघ्या आकाशभर पसरलेल्या चांदण्यांसारख्या असलेल्या आपल्या सिनेसंगीताच्या विश्‍वात लतादीदींचे गाणे कोणत्याही दिशेने पाहिले तरी दृष्टीस पडणारे होते. या स्वर्गीय स्वराच्या अंमलाखाली आपण सुनिश्‍चितपणे गुंगून गेलो होतो. अचानक हे सात दशकांहून अधिक काळ अवघे राष्ट्र पाहात असलेले स्वप्न समाप्त झाले आहे. त्यांचे ङ्गऐ मेरे वतन के लोगोंफ ऐकून साठ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत जसे पाणी आले, ते आज साठीत असलेल्या किंवा विशीत असलेल्या रसिकाच्या डोळ्यांत त्यांच्या गाण्यांतील विविध भावभावना अनुभवताना आजही येते. देशविदेशातील तब्बल 36 भाषांतून गायलेल्या गाण्यांद्वारे त्यांनी भावविभोर करून टाकले नाही असा माणूस शोधणे कठीण आहे. स्वातंत्र्याच्या काळातील रसिकांपासून एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या मिलेनियल्सनाही त्यांनी आपल्या स्वरराज्यात सामील करून घेतले होते. मास्टर दीनानाथ या संगीतसूर्याच्या पोटी जन्मलेल्या आणि संगीतसंस्कार लाभलेल्या लताने वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या आवाजातील दैवी स्वरांचे अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. वडिलांच्या अकाली निधनानंतर लता आधी मास्टर विनायक व नंतर उस्ताद अमन अली खान यांच्या शागीर्द बनल्या. ज्येष्ठ संगीतकार उस्ताद गुलाम हैदर हे खर्‍या अर्थाने लताच्या प्रतिभेचे द्रष्टे भाकितकर्ते आणि मेंटॉर ठरले. त्यांनी तिला केवळ पहिले हिट गाणे दिले नाही तर येणार्‍या दशकांत लताने आपल्यासाठी गावे यासाठी सगळेजण तिच्या पायाशी येतील, असे भाकित केले. ते लवकरच खरेही ठरले आणि पुढील अनेक दशके लताचे स्वरराज्य भारतावर कायम राहिले. मधुबालावर चित्रीत ङ्गआएगा आनेवालाफ हे महल चित्रपटातील गाणे लतासाठी व्यावसायिकदृष्ट्या पहिले सर्वाधिक हिट गाणे ठरले. साल होते 1949. त्यानंतरचे दशक हे अनिल विश्‍वास, शंकर जयकिशन, नौशाद, एसडी बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, खय्याम, सज्जाद हुसैन, सलील चौधरी, कल्याणजी आनंदजी, सुधीर फडके, वसंत देसाई, मदन मोहन आणि अशा असंख्य एकाहून एक सरस संगीतकारांचा काळ होता. हिंदी सिनेसंगीताचा हा सुवर्णकाळ मानला जातो. त्यात लताचा आवाज अविभाज्य बनला.

1958 मध्ये ङ्गमधुमतीफमधील ङ्गआजा रे परदेसीफ यासाठी पहिले फिल्मफेअर मिळाले. पुढे राष्ट्रीय पुरस्कार आणि नंतर ङ्गभारतरत्नफपर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांचा प्रभाव पुढच्या दशकातही कसा वाढत गेला याचे द्योतक आहे. पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल, आरडी बर्मन असे नवे संगीतकार आले. त्यांच्यासाठीही लताचा आवाज अटळ ठरला. तीच बाब सहगायकांची. किशोर, मुकेश, मोहम्मद रफी हे त्यांचे आधीचे सहगायक होते. काळासोबत संगीतकार बदलले तसे सहगायकही. भारत बदलला, अभिरुची बदलली, मात्र लताचा आवाज ध्रुवतार्‍यासारखा स्थिर आणि नित्य होता. या क्षेत्रातील कारकीर्द एखाद्या पिढीपर्यंतची असते, मात्र लतादीदींनी आधी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांची पुढची पिढी संगीतकार म्हणून आली, त्यांच्यासाठीही त्या गाणे गायल्या. ङ्गरंग दे बसंतीफसाठी ए.आर. रहमान या आधुनिकोत्तर संगीतकारासाठीही त्यांनी आपला आवाज दिला आणि ङ्गलुका छुपीफ हे विलक्षण लोकप्रिय गाणे दिले. इतक्या त्या हरेक दशकात समर्पक ठरल्या. म्हणून त्यांचा आवाज हा स्वतंत्र भारताचा सुवर्णोतेहिस आहे. सत्तर मजली इमारतीतील आलिशान फ्लॅटमध्ये त्यांचे आवाज घुमतात, तसेच ते रस्त्याकाठी झावळ्यांनी उभारलेल्या टपरीभोवतीही वावरत असतात. सुखासीन माणसाला जितका ते मनाला आराम देतात, तितकेच त्यांचे स्वर शरीर मोडून काम करणार्‍यांचे विसाव्याचे क्षण सुखद बनवतात. त्या अर्थाने लतादीदींनी आपल्या सगळ्यांचे जीवन संगीतमय केले. त्या गात होत्या आणि आपण सुनिश्‍चित होतो. लतादीदीच्या असण्याने ही नीती होती. आता त्या तार्‍यांच्या पलीकडच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. आपले सूरमयी तारांगण आपल्यासाठी मागे ठेवून गेल्या आहेत. सभोवती काळोख असताना आकाशाकडे पाहिल्यावर तारे कायम दिसतात आणि दिलासा देतात, तसा त्यांचा स्वर, संगीत इथून पुढची शतकेही जगाला शांतवत राहील. लतादीदींना विनम्र आदरांजली!

Exit mobile version