अलिबाग आगाराचं रुपड पालटणार

सुशोभिकरणासाठी संस्था सरसावल्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना दर्जेदार आणि गुणात्मक सेवा देण्याच्या उद्देशाने स्वच्छ बसेस, बसस्थानके, सुंदर बसस्थानक परिसर आणि टापटीप प्रसाधनगृहे या त्रिसूत्रावर आधारित बस स्थानके कात टाकणार आहेत. त्यामध्ये बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण केले जाणार आहे. सर्व बसस्थानकावर स्वखर्चाने स्वच्छता, सुशोभिकरण व सौंदर्यीकरण परिसरातील लघु, मध्यम व मोठे उद्योजक, व्यापारी सहकारी संस्थामार्फत सामाजिक बांधिलकीतून केले जाणार आहे. याबाबत रायगड विभागाकडून आवाहन करण्यात आले असून त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. बस स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी संस्थांनी पुढाकार घेतल्याचे चित्र समोर येत आहे. बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी करणे, विद्युत उपकरणाची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे इत्यादी अनुषंगिक गोष्टी सुव्यवस्थित करणे. बसस्थानकाच्या मुख्य इमारतींची रंगरंगोटी करणे. बसस्थानकाच्या प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती करुन ते स्वच्छ नीटनेटके व निर्जंतूक ठेवण्याच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण, बसस्थानकाच्या प्रत्येक फलाटावर गावांचे मार्गदर्शक फलक व प्रवाशांना पुरविण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधांचे विहित नमुन्यात तयार करणे. बस स्थानक व परिसराची दैनंदिन स्वच्छता, सुशोभिकरण व सौंदर्यकरण करणे. इतर कामे या सर्व कामांची, देखभाल व दुरुस्ती 1 वर्षांसाठी असणार आहे.

संस्थेचे काम उत्कृष्ट असल्यास करार पुढील 2 वर्षांसाठी वाढविण्यात येणार आहे. या बदल्यात बसस्थानकांमध्ये संबंधित संस्थेला त्यांच्या स्वतः च्या उत्पादनाची अथवा सेवेची वर्षभरासाठी जाहिरात प्रसिध्दी व विक्री करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्या संस्थेला स्थानक परिसरात दहा बाय दहा फूट आकाराची मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बसस्थानकाच्या मुख्य इमारतीवर प्रत्येक फलटावर लावण्यात येणार्‍या गावाचे मार्गदर्शक फलकावर त्या एकूण फलकाच्या आकाराच्या एक तृतीयांश जागेवर संबंधित संस्थेच्या उत्पादन अथवा सेवेची जाहिरात करता येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थाना आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. काही संस्थांनी जिल्ह्यातील बस स्थानकात फलक स्वखर्चाने लावले आहेत. तर काही ठिकाणी पर्यटन स्थळांची माहिती देखील दिली जात आहे. बसस्थानकांची स्वच्छता सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

Exit mobile version