ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
तरुणांचा ध्यास गाव शहराचा विकास या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पालीतील शेठ जे. नौ. पालीवाला महाविद्यालयाचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबीर भार्जे येथे संपन्न झाले. या शिबिरात बंधारा बांधून तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी गावचे रूप पालटले आहे. या शिबिराचे उद्घाटन सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह गीता पालरेच्या यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोप सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिबिराच्या सात दिवसात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावातील एकानेक कानाकोपर्याची स्वच्छता केली. शाळेच्या परिसरातील स्वच्छता, स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व कचरा एकत्रित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, आणि विशेष म्हणजे पावसाळा संपल्यानंतर डिसेंबर मध्ये आटत असलेल्या भार्जे येथील नदीचे पाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधून आडवले आहे. परिणामी बंधार्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. आणि त्यामुळे भुजलस्तर वाढण्यास मदत झाली आहे. माणसांना व गुरांना पिण्यासाठी पाणी व वापरासाठी पाणी मिळत आहे.
या शिबिरा दरम्यान सरपंच अनुसया पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष माधुरी जाधव, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पोलिस पाटील जाधव, रा. जि. प. शाळेचे मुख्याध्यापक कैलास म्हात्रे, शिक्षकवृंद, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक रमेश साळुंखे, चंद्रकांत गोफन, रामदास चव्हाण,गणपती चव्हाण आदीसह सर्व ग्रामस्थांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले. योगा प्राणायाम साठी सुधागड गटविकास अधिकारी अशोक महामुनी यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी पालीवाला महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सुधागड एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव रविकांत घोसाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. ज्ञानेश्वर मुंढे, प्रा. राकेश शिर्के, प्रा. संतोष भोईर, मारुती शिंदे, सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
प्रबोधन व जनजागृती
विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नाटुकली आणि नृत्याविष्कार च्या माध्यमातून गावकर्यांमध्ये जलसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, आहार-विहार आणि योग प्राणायाम, उच्च शिक्षण, मराठी शाळांचे महत्त्व इत्यादी सामाजिक प्रश्नांप्रती जनजागृती व प्रबोधन केले. विविध विषयांवरील मार्गदर्शक व्याख्याने, संध्याकाळी ग्रामसर्वेक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे रात्री साडेदहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे करत असताना ग्रामस्थांनी देखील या शिबिराला सहकार्य करून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. नेतृत्व गुण वाढीस लागतात, एक चांगला वक्ता तयार होतो. समाज सेवक, आदर्श नागरिक निर्माण होतो आणि स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते. – प्रा. स्नेहल बेलवलकर, कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना







