बिहार क्रिकेटमधील दुफळी चव्हाटयावर!

मुंबईविरुद्धच्या रणजी लढतीसाठी दोन संघांची हजेरी


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बिहार क्रिकेट संघटना आणि वाद हे समीकरण अजून मिटलेले नाही. बिहार क्रिकेट संघटनेमधील दुफळी रणजी करंडकाच्या पहिल्या सामन्यात चव्हाटयावर आली. मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी पहिल्या दिवशी मैदानावर बिहारचे दोन संघ उपस्थित होते. दोन दशकांहून अधिक काळ बिहार क्रिकेट संघटना वादग्रस्त प्रकरणांमुळेच चर्चेत राहिली आहे. यामुळेच ईशान किशन आणि मुकेश कुमार यांनी आपला घरचा संघ सोडून अन्य राज्यांकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतरही बिहार संघटनेने धडा घेतलेला नाही.मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी पहिल्या दिवशी शुक्रवारी बिहारचे दोन संघ मैदानात उपस्थित होते. यातील एक संघ सचिव अमित कुमार यांनी निवडला होता, तर दुसरा संघ अध्यक्ष राकेश तिवारींच्या स्वाक्षरीसह जाहीर करण्यात आला होता. अखेरीस तिवारींनी संमती दिलेला संघ अंतिम करण्यात आला. मात्र, यामुळे बिहार क्रिकेट संघटनेतील गटबाजी पुन्हा वाईट पद्धतीने समोर आली.

बिहार क्रिकेट संघटना 2002 सालापासूनच विविध वादांमध्ये अडकली आहे. 2002मध्ये ‌‘बीसीसीआय’चे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील बिहार क्रिकेट संघटना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. दालमियांनी अमिताभ चौधरींच्या गटाला मान्यता दिली. दरम्यानच्या काळात माजी अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद यांनी बिहार क्रिकेट संघटनेची नव्याने स्थापना केली. त्यांना आव्हान म्हणून वर्मा आणि प्रेम रंजन पटेल यांनी ‌‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहार’ अशा नावाने स्वतंत्र संघटना तयार केली. त्या वेळेस बिहारमध्ये चार क्रिकेट संघटना होत्या. निवड चाचणी खेळण्यासाठीही तेथे लाच द्यावी लागत होती. याला कंटाळून मधल्या काळात बिहारच्या अनेक प्रमुख खेळाडूंनी दुसऱ्या राज्यांचा पर्याय स्वीकारला. बहुतेक अधिकारी केवळ पैसे कमाविण्यासाठी संघटनेत दाखल झाले. क्रिकेटच्या प्रगती आणि विकासाकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही, असे एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

आम्ही 12 वर्षीय गुणी क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला रणजी पदार्पणाची संधी दिली. मात्र, येथील राजकारणाला कंटाळून भविष्यात त्याने बाहेरून खेळण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही. अशी टांगती तलवार संघटनेच्या डोक्यावर कायम असते, असेही हा पदाधिकारी म्हणाला.

Exit mobile version