| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहत आहेत. या समाजातील बांधवांच्या ग्रामदैवताच्या जत्रा उत्सवाला सध्या गावागावात सुरुवात झाली आहे. त्यामुळे या समाजाबरोबर इतर समाजातील बांधव गावोगावच्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवीची जत्रा, पालखी उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. यावेळी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय, भक्तगण उपस्थित राहून श्री रत्नेश्वरी देवीच्या चरणी माथा टेकवून आपआपल्या कुटुंबाला सुख समाधान दे, अशा प्रकारचे साकडे घालतात.
उरण तालुक्यातील जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवी, करंजा गावातील श्री द्रोणागिरी देवी, नवीन शेवा गावची श्री शांतेश्वरी देवी, डोंगरी गावची श्री अंबामाता, चिरनेर गावची श्री गावदेवी माता, फुंडेगावची श्री घुरबादेवी, कोप्रोली गावची श्री जरीमरी आई. कोटगावचा श्री राघोबा देव तसेच इतर गावाचे ग्रामदैवत श्री बापूजीदेव या ग्रामदैवतांच्या जत्रा उत्सवाला सुरुवात ही कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या जत्रा उत्सवानंतर झाली आहे. जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात श्री देवीची ख्याती आहे. एक जागृत देवस्थान म्हणून हजारो भक्त दरवर्षी रत्नेश्वरी देवीच्या चरणी माथा टेकवतात. श्री देवीच नवीन भलं मोठ मंदिरदेखील भाविक भक्तांना एक भक्तिमय अनुभव देऊन जातो. अशा ग्रामदैवताच्या जत्रा उत्सवाला सध्या सुरुवात झाली असून हजारो लाखो भाविक हे आपल्या लाडक्या श्री ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करताना दिसत आहेत.







