| रायगड | वार्ताहर |
मूळची वारंगी गावची व सध्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे राहणारी जिने मॉडेलिंग क्षेत्रात देशात तसेच सातासमुद्रापलीकडे नावलौकिक कमाविले. सन 2022 मध्ये सीमला येथे झालेल्या स्पर्धेत ‘द फेम मिस इंडिया’ हा किताब पटकाविणारी रायगडवासियांची अभिमान प्रणाली लक्ष्मण खांबे. तिने आज मॉडेलिंगच्या दुनियेत आपले व आपल्या गावचे नाव सर्वदूर पोहोचवून उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. यातून तिने शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागातील मुलं-मुलीही कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिले आहे.
द फेम मिस इंडिया ठरलेली प्रणाली लक्ष्मण खांबे हिचे शालेय शिक्षण माणगाव तालुक्यातील ना.म. जोशी. विद्यामंदिर गोरेगाव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण दोशी वकील कॉलेज येथे होऊन नोकरी करीत तिने बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतले. बी.कॉम.नंतर तिने पुण्यामध्ये दीड वर्ष एमपीएससी केली. लहानपणापासूनच प्रणालीला अभिनयाची आवड होती, पण घरच्या मंडळींचा पाठिंबा नसल्याने तिला प्रथमतः शिक्षण पूर्ण करावे लागले. एमपीएससीमध्ये मन लागत नसल्यामुळे तिने आपली लहानपणापासूनची अभिनयाची आवड जोपासण्यासाठी ती मुंबईला गेली. कलाक्षेत्रात कोणाची ओळख नसल्याने तिला सुरुवातीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण त्या संकटांना न डगमगता आपण मनाशी धरलेलं ध्येय गाठायचे अशी खूणगाठ प्रणालीने आपल्या मनाशी ठामपणे बाळगून तिने एक एक पायरी ओलांडत आपले ध्येय गाठले. गावातून आल्यामुळे काही करू शकणार नाही म्हणून बोलणेही तिला ऐकावे लागले. पेहराव (ड्रेसिंग सेन्स) व मेकअप येत नाही म्हणूनसुद्धा सुरुवातीला बर्याच गोष्टींना तिला सामोरे जावे लागले.
पण तिने आपले प्रयत्न सोडले नाही. ही स्वामींची इच्छा, एक चावट मधुचंद्र, जमलं रे जमलं या व्यावसायिक नाटकांमधून तिने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर तिला काही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, पाहिले न मी तुला, भेटी लागे जिवा, परमावतार कृष्ण, कहत हनुमान जय श्री राम या मालिकांमधून तिने अभिनय सादर केला. तसेच काही वेब मालिकांमध्ये अभिनय सादर केला. सुशांत सिह राजपूत या कलाकाराच्या आत्महत्या प्रकरणावरती निर्देशित (न्याय द जस्टिज) या सिनेमामध्ये सुधाचंद्रन मॅडम सोबत अभिनय करण्याची संधी प्रणालीला मिळून तो सिनेमा अजून प्रदर्शित झालेला नाही. जीव झाला येडापीसा या गाण्यामधून मुख्य भूमिका प्रणालीने साकारली आहे. तिने बर्याचशा सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला अनेक ठिकाणी तिला अपयश आले, पण तिने आपले ध्येय, चिकाटी, अथक परिश्रम सोडले नाही. तब्ब्ल 5 वर्षानंतर प्रणालीला य मॉडेलिंग क्षेत्रात यश आले. अमरावती मध्ये सन 2022 मध्ये जिल्हा अमरावतीमध्ये झालेल्या ‘द फेम मिस महाराष्ट्र’ या स्पर्धेत प्रणालीला द्वितीय क्रमांक मिळून तिची या स्पर्धेतून सिमला येथे द फेम मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली. सिमला येथील स्पर्धेत तिने ‘द फेम मिस इंडिया’ हा किताब पटकावून ग्रामीण भागातील मुलीहि भरारी घेऊ शकतात हे दाखवून देऊन तिने आपले स्वप्न साकार केले.







