कोरोना बळींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. याबाबतच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे सांगणारी केंद्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी, पण ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाईची किती रक्कम देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सहा आठवड्यांच्या आत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले. कोरोना मृत्यूंच्या नुकसान भरपाईसाठी याचिकेत चार लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.


केंद्राचा याचिकेला विरोध
एसडीआरएफ फंडातील सर्वच निधी करोनाबळींच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यासाठी वापरण्यात आला, तर कोरोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी, विविध अत्यावश्यक औषधी आणि पुरवठा साहित्यासाठी किंवा चक्रीवादळं आणि पूर परिस्थितीबद्दल मदत करण्यासंदर्भात राज्यांकडे पैसाच राहणार नाही. ही मागणी राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेपलीकडची आहे, ही अशी भूमिका केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात मांडली होती.

Exit mobile version