धूळवाफे पेरणीसाठी बळीराजाची झुंबड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मान्सूनची चाहूल लागताच बळीराजाची भातपेरणीसाठी धांदल उडाली आहे. काही शेतकर्यांनी धूळवाफे पेरणीवर भर दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी धूळवाफे पेरणीच्या तयारीला लागले असून, ठिकठिकाणी त्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेत शिवारे गजबलेली दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 98 हजारांहून अधिक भातलागवडीचे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून, मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी सध्या जिल्ह्यात मशागतीची धांदल सुरू आहे. जिल्ह्यात खरीपामध्ये प्रामुख्याने भाताचे क्षेत्र अधिक असल्याने भाताची लागवड केली जाते. दरम्यान, शेतकर्यांना भात बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये भात बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. बियाणे खरेदीला शेतकर्यांकडून सुरुवात झाली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. मात्र, पावसाला सुरुवात होण्याअगोदर धूळवाफे पेरणी केली असता भाताची उगवणी चांगली होते, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीसाठी धांदल सुरू आहे. सध्या बळीराजा सहकुटुंब शेतशिवारात पेरणीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये अलिबागसह अनेक भागांमध्ये वाफे तथा धूळपेरणीला गेल्या अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यामध्ये धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी पेरणीच्या कामात मग्न आहेत. पेरणीच्या कामाचा आढावा घेण्याचे काम एक जूनपासून सुरु केले आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी हवामानाचा अंदाज घेत पेरणीची कामे करावी. दुबार पेरणीचे संकट येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
वंदना शिंदे
जिल्हा अधीक्षक,
कृषी अधिकारी