मोळ्या जाळून शेतकर्‍याने केला प्रशासनाचा निषेध

अवकाळी पावसाने शेतकर्‍याचे झाले होते नुकसान

। नेरळ । वार्ताहर ।

अवकाळी पावसाने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करायला वेळ नाही तर नुकसानभरपाई मिळणार कधी म्हणून राग अनावर झालेल्या या शेतकर्‍याने भात पेंढ्याच्या मोळीला आग लावून प्रशासनाचा निषेध केला. कर्जत तालुक्यातील सावेळे या ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना घडली.

कर्जत तालुक्यात मागील झालेल्या अवकाळी, चक्रीवादळी पावसाने सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बहुतांशी ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या घरांचे छप्पर उडून गेले आहेत. कोणाच्या दुबार भात शेतीचे तर आंबा बागेचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. परंतु, अद्यापही शासन शेतकर्‍याच्या दारावर पोहचलेला नाही. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे होऊ शकलेले नाही. पंचनामेच होत नाही तर नुकसान भरपाई मिळणार कधी, असा प्रश्‍न सध्या शेतकर्‍यांच्या पुढे उभा ठाकला आहे.

तोंडावर मान्सून येऊन ठेपला. अशातच तालुक्यातील दुर्गम भागातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील सापेले गावात राहणार्‍या शेतकर्‍याने संतप्त होत आपल्या शेतात जनावरांसाठी साठवून ठेवलेला भात पिकाचा पेंढा आग लावून पेटवून दिला. नितीन विचारे असे या शेतकर्‍याचे नाव आहे. वर्षाकाठी जनावरांना खाण्यासाठी लागणारा चारा विचारे यांनी शेतात ढीग करून ठेवल्या होता. भात कापणीनंतर झोडणी करून शिल्लक राहिलेल्या पेंढा हा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरात येतो. यामुळे शेतकर्‍याचा जनावरांवर खाद्यासाठी होणारा खर्च कमी प्रमाणात होतो. परंतु, तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने हा पेंढा भिजून गेला होता. पाण्यात पेंढा भिजल्याने तो काळा पडून कुजल्याने जनावरांना असा पेंढा खाण्यास उपयुक्त नसून जनावरेदेखील हा चारा खात नाहीत. पन्नास हजाराहून अधिक रुपये किमतीचा हा चारा शेतकरी विचारे यांनी जनावरांसाठी साठवून ठेवला होता. परंतु आता हा चारा भिजून शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेला आठवडा उलटूनही प्रशासन, तलाठी, तहसीलदार, अधिकारी कुठे शेतकर्‍याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बांधावर पोहचलेला दिसला नाही. अखेर राग अनावर झालेल्या या शेतकर्‍याने आपल्या शेतातच भिजलेल्या भात पेंढ्यांच्या मोळीला आग लावली.

एकूणच तलाठी, तहसीलदार तर संबंधित प्रशासन अधिकारी आर्थिक फायद्यासाठी कारवाईचा दृष्टीने शेतकर्‍यांच्या बांधावर धावलेली कधीकाळी पाहिली परंतु, तिच यंत्रणा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यासाठी कधी कार्यतत्परतेने धावलेली दिसली नाही. त्यामुळे हाताच्या बोटावर तालुक्यातील शिल्लक राहिलेला शेतकरी येणार्‍या काळात शिल्लक राहिल की नाही, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version