बळीराजाची भातपीक वाचविण्याची धडपड

जिल्ह्यात भात पीक कापणीला सुरुवात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भात कापणीचा हंगाम सुरु झाला आहे. ऐन भात कापणीच्या कालावधीत पाऊस पडल्यास भातपीक भिजण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून काही प्रमाणात वाचलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.

यावर्षी रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 84 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली. मात्र, भात बहरण्याच्या तयारी असताना पावसाने दडी मारली. पाऊस गायब झाला. त्यामुळे पिकाला मोठा फटका बसला. पाण्याअभावी अनेक ठिकाणी भाताचे दाणे अपेक्षेप्रमाणे भरले नाहीत. परिणामी, भाताच्या उत्पादनात साधारणे 50 टक्केहन अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये भातशेतीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पिकाची वाढ खुंटली, तर काही भागांत दाणे पूर्णपणे भरले नाहीत. अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा आता कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादनाचा खर्चही भरून निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.

यंदाच्या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. पिकाला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने पाठ फिरवल्याने भातशेतीचे नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भात कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. दुष्काळामुळे आधीच उत्पादन घटण्याची भीती व्यक्त झाली आहे. त्यात वाचलेले पीक पदरी पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरु केले आहे. अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. शेतात उभे असलेले पीक वेळेत कापणे, कापलेले भात सुरक्षित ठिकाणी ठेवणे आणि पावसापासून त्याचे संरक्षण करणे, अशी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत.

ताळमेळ साधताना होतेय दमछाक
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागसह अनेक भागात भातकापणीच्या कामांना वेग आला आहे. भात कापणीसह झोडणी करून भात घरात जमविण्याची धडपड सुरु झाली आहे. उपलब्ध वेळेत पीक काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिव कापणीची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. मात्र, मजुरांची उपलब्धता, कापणीसाठी लागणारा वेळ आणि बदलते हवामान यांचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
Exit mobile version