वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या मंकी पॉईंट, मालडुंगा पॉईंट भागातील 36 एकर जमिनीवर वसलेल्या एल्फिन्स्टन बंगला परिसरात तेथील जमीन मालकाकडून तारेचे कुंपण घालण्यात आले होते. त्यामुळे या परिसरातून सैर करणाऱ्या वन्यजीवांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. अखेर महसूल अधीक्षकांच्या आदेशाने वन विभागाने एल्फिन्स्टन बंगला मालकाने घातलेले लोखंडी तारेचे कुंपण हटवले आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या आरिवासाचा जंगलात सैर करू शकतात.
माथेरान शहर हे वन जमिनीवर वसले असून या ठिकाणी असलेली वनसंपदा ही येथील वन्य प्राण्यांचा आदिवास समजला जातो. तसेच, माथेरानमधील वन नियम आणि कायदे हे राज्याच्या अन्य भागांपेक्षा वेगळे आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून या ठिकाणी सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपराच सुरू झाली आहे. ब्रिटिशांनी वसवलेल्या माथेरानमध्ये वनसंपदा लक्षात घेऊनच कडक कायदे बनवले आहेत. येथील जंगल भाग मोठ्या प्रमाणात असल्याने जंगली प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे या प्राण्यांना जंगलात मुक्त संचार करता यावा यासाठी माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारचे कुंपण घातले जाऊ नये, असे मुंबई वन कायद्यात नियम आहेत. परंतु, येथील जंगलातील झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहे. तसेच अनधिकृत बांधकामे करून काँक्रीटचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येथील वन्य जीवांचा आदिवास संकटात येऊ शकतो.
अशातच माथेरानमधील एल्फिन्स्टन रोड भागातील 36 एकर जमिनीमध्ये व्यापलेल्या एल्फिस्टन बंगला परिसरात बहुसंख्य जमीन झाडांनी व्यापली आहे. मंकी पॉईंट रोड ते दरीपर्यंत आणि पुढे टोपीवाला बंगला ते मंकी पॉईंटपर्यंत व्यापला आहे. याच एलफिस्टन बंगल्याच्या मालकाकडून त्या ठिकाणी बंगल्याचे मुख्य गेट ते मंकी पॉईंट असे लोखंडी तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्याला माथेरान शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. शिंदे यांनी महसूल अधीक्षक तसेच पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात, माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असून देखील जंगल हे बंदिस्त झाले तर वन्यजीव प्राण्यांचे काय होणार? तसेच, जमिनीलगत लोखंडी तारेचे कुंपण घातल्यास प्राण्यांचा जंगलातून येण्या-जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा येथील अधिवास धोक्यात येऊन ते स्थलांतरित होऊ शकतात, असे म्हटले आहे. याबाबत महसूल अधीक्षक सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, कायद्याचा आधार घेतला तर माथेरान हे पशु पक्षी आणि वन्य प्राण्यांचे आदिवासाचे ठिकाण आहे. त्यामुळे माथेरानमध्ये कोठेही कुंपण घालून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद करता येणार नाही. तसेच, त्यांनी वन विभागाला संबंधित ठिकाणी लोखंडी तारेचे सुरू असलेले कुंपण तात्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वन विभागाने एल्फिन्स्टन बंगला परिसरात घालण्यात आलेले लोखंडी जाळी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता वन्यजीवांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला आहे. तसेच, दुसरीकडे अजूनही काही ठिकाणी लोखंडी जाळी आहे. ती जाळी देखील काढण्यात यावी, अशी मागणी पुढे कायम ठेवली आहे.







