790 मेट्रीक टन खताचा पुरवठा
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यामध्ये भात लावणीची कामे पुर्ण झाली आहेत. मात्र, भाताच्या रोपांच्या वाढीसाठी खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आता मात्र युरिया खताचा प्रश्न सुटणार आहे. एक ते सात ऑगस्ट या कालावधीत 790 मेट्रीक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात आरसीएफ कंपनी कडुन करण्यात आला आहे. उर्वरित यूरिया खताचा देखील यापुढे जिल्ह्यात नियमितपणे पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये खतांचा पुरवठा केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये 86 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, यंदा पावसामुळे पेरणी करण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यात अधिक पाऊस पडल्याने काही भाताची रोपे कुजून गेली. लागवडीसाठी रोपे उपलब्ध नसल्याने अनेक शेत जमीन ओसाड गेली. जिल्ह्यात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. सद्यस्थितीत भाताची लागवड पूर्ण होत आली आहे. भात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसात पेण, अलिबाग, उरण व पनवेल या तालुक्यांमध्ये युरिया खताच्या टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली होती. भाताची रोपे वाढीसाठी युरिया खताची गरज भासली होती. खतासाठी वणवण निर्माण झाली होती. परंतु, आता खतासाठी चिंता करण्याची काही गरज नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. जिल्ह्यात एक एप्रिल ते 30 सप्टेंबर या खरीप हंगामासाठी 11 हजार 931 मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर आहे. 1 एप्रिल पासून आतापर्यंत एकूण 9150 मेट्रीक टन यूरिया व बफर स्टॉक मधील 698 मेट्रीक टन असा एकूण 9 हजार 848 मेट्रीक यूरिया खताचा पुरवठा जिल्ह्यात झाला आहे. त्यापैकी एक ते 7 ऑगस्ट या सात दिवसाच्या कालावधीत 790 मेट्रीक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात आरसीएफ कंपनी कडून करण्यात आला आहे. उर्वरित यूरिया खताचा देखील यापुढे जिल्ह्यात नियमितपणे पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
विक्री केंद्रावर सर्व उत्पादने व त्यांची अधिकृत किंमती स्पष्टपणे फलकावर दर्शवाव्यात. शेतकऱ्यांना पक्के बिल देणे अनिवार्य आहे. दररोजचा खरेदी-विक्रीसाठा नोंदवहीत नियमित लिहावा. फक्त अधिकृत कंपन्यांचे, सरकारमान्य उत्पादनेच विक्रीसाठी ठेवावीत. नकली किंवा कालबाह्य उत्पादने विक्रीस ठेवू नयेत.
खताची विक्री ई पॉस मशीनद्वारेच करावी हे सर्व सूचनांचे कृषी केंद्र धारकांनी पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास नियमा प्रमाणे उचित कार्यवाही, तसेच कारवाई करण्यात येईल, अशी सुचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये खताचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात दोनशेहून अधिक खत विक्रीची दुकाने आहेत. शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत कृषी केंद्र धारकांकडूनच खत खरेदी करावे. घेतलेल्या खताचे पक्के बिल अथवा पावती कृषी केंद्र धारकांकडून घ्यावे. काही गैरप्रकार आढळल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून तक्रार नोंदवावा.
वंदना शिंदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
