प्रदीप पूर्णेकरांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट
| ठाणे | विशेष प्रतिनिधी |
आगरी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणारे, वंचित व उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे तसेच नशामुक्तीच्या चळवळीत सक्रियपणे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते स्व. प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.6) मानपाडा येथील पूर्णेकर यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी स्व. प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पूर्णेकर परिवाराच्या दुःखात आपण आणि शेतकरी कामगार पक्ष सहभागी असल्याचे सांगितले. पूर्णेकर परिवाराची सामाजिक बांधिलकीची परंपरा मोठी आहे. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. आगरी समाजाच्या प्रश्नांना केवळ सामाजिक पातळीवर न ठेवता त्यांना न्याय, हक्क आणि विकासाच्या व्यापक प्रश्नांशी जोडण्याचे काम पूर्णेकर यांनी केले. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर आवाज उठविताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मानपाडा परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांबरोबरच प्रस्तावित क्लस्टर प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी स्व. प्रदीप पूर्णेकर यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण होती, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.
यावेळी पूर्णेकर परिवारातील सदस्य, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. राजू कोरडे, ठाणे जिल्हा चिटणीस प्रसाद साळवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक कार्याची मशाल विझू देणार नाही
तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात जाऊ नये, समाजामध्ये व्यसनमुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पूर्णेकर यांनी नशामुक्तीच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावली. सामाजिक प्रश्नांकडे केवळ तक्रारीच्या दृष्टीने न पाहता त्यावर जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याची त्यांची भूमिका होती. आगरी समाजाच्या हक्कांसाठी आणि परिसरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी पूर्णेकर यांनी कायम भूमिका घेतली. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, त्याच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, ही त्यांची भूमिका होती. पुर्णेकर यांचे सामाजिक कार्य आणि विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यासाठी शेतकरी कामगार पक्ष पूर्णेकर परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
