क्रिकेट चाहत्यांना पाचव्या सामन्याची प्रतिक्षा; भारताची आतापर्यत उत्तम कामगिरी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना धुक्यांमुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे मालिका रंगतदार स्थितीत आहे. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर ही मालिका 2-2 ने बरोबरीचत सोडवण्याचे आव्हान आहे.
चौथा सामना हा धुक्यांमुळे रद्द झाला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून पाचवा सामनाही धुक्यांमुळे रद्द होणार नाहीना याची मनात भीती निर्माण झाली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्याचे आयोजन हे बुधवारी 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होते. हा सामना तब्बल 6 वेळा पाहणी केल्यानंतर टॉस विना रद्द करण्यात आला. लखनौतील धुक्यांमुळे हा सामना होऊ शकला नाही. धुक्यांमुळे दृष्यमानता कमी होते. त्यामुळे फिल्डिंग करताना खेळाडूंना समस्या उद्भवते. त्यामुळे पंचांकडून ठराविक अंतराने दृष्यमानता योग्य आहे की नाही? याची पाहणी करण्यात आली होती.
मात्र अखेरपर्यंत धुक्यांमुळे दृष्यमानता सामना होण्यासाठी पूरक नव्हती. त्यामुळे हा सामना नाईलाजाने रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. चाहत्यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला. आता क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्याची प्रतिक्षा आहे. मालिकेतील पाचवा सामना हा 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
अहमदाबादमधील हवामान
अहमदाबादमध्ये सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये 19 डिसेंबरला आकाश निरभ्र राहिल. तर तापमान 15 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल. तसेच अहमदाबादमधील हवा निर्देशांक हा 100 ते 120 दरम्यान राहिल. त्यामुळे सामना निकाली निघण्याची पूर्ण शक्यता आहे.
खेळपट्टी फायदेशीर फलंदाजांना अनुकुल
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक ठरु शकते. या मैदानात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता अधिक आहे. आऊटफिल्ड फास्ट असल्याने या मैदानात मोठी धावसंख्या होऊ शकते. तसेच नव्या बॉलने गोलंदाजांना मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अहमदाबादमधील कामगिरी
भारतीय संघाची अहमदाबादमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानात एकूण 7 टी -20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 टी -20 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाने भारतावर मात केली आहे.
