सहा सामन्यांच्या तारखा बदलल्या
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अतिमहत्वाच्यासामन्याव्यतिरिक्त इतर मोठ्या सामन्यांच्या तारखा देखील बदलल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित वर्ल्ड कप सामना 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. पीसीबीने त्यांच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. नवरात्रोत्सवामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या हाई-वोल्टेज सामन्यासह एकूण 6 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होणार आहे. अहवालानुसार, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना 12 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबरला होऊ शकतो. न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यातील विश्वचषक सामना 9 ऑक्टोबर ऐवजी 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषक सामना 14 ऑक्टोबर ऐवजी 15 ऑक्टोबरला होऊ शकतो.
नवीन वेळापत्रक 2 किंवा 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाऊ शकते. अलीकडेच बीसीसीआय सचिव म्हणाले होते की, 2023 च्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारताच्या यजमानपदी खेळवला जाईल.अशी माहिती त्यानी दिली आहे.
या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांची तात्पुरती वेळ सकाळी 10:30 आणि दुपारी 2 अशी ठेवण्यात आली आहे. विश्वचषक जवळ आल्याने सामन्यांच्या वेळेतही बदल केले जाऊ शकतात.
भारताचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, 14 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड 22 ऑक्टोबर धर्मशाळा
भारत विरुद्ध इंग्लंड, 29ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध नेदरलँड्स, 2नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध श्रीलंका, 11 नोव्हेंबर, बेंगळुरू