| लंडन | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडमध्ये कसोटी विश्वचषक अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याची क्रिकेटविश्वाला उत्सुकता लागली आहे. या सामन्यात ड्युक चेंडू वापरला जाणार आहे. हा चेंडू कोणत्या संघाला उपयुक्त ठरतोय याबाबत जोरदार चर्चा सुरु झआलेली आहे.
भारतात कसोटी सामने एसजी बॉलने खेळले जातात, तर ऑस्ट्रेलियात कुकाबुरा वापरला जातो. पण अंतिम सामना ड्यूक बॉलने होणार आहे. क्रिकेटची जागतिक संघटना असलेल्या आयसीसीनेही याचे कारण दिले आहे. अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे त्यामुळे यजमान देशानुसार सामन्यात चेंडूचा वापर केला जाईल. इंग्लंडमधील कसोटी सामने ड्यूक चेंडूने खेळले जातात. आयसीसीच्या सूत्राने सांगितले की, आयसीसी सामन्यात यजमान देशाच्या मर्जीतील चेंडूचा वापर करते. त्यामुळे अंतिम सामन्यातही फक्त ड्यूक बॉल वापरला जाईल. याआधी 2021 मध्येही कसोटी विश्वचषक अजिंक्यपदासाठीही पहिल्या सत्राचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता आणि तेव्हाही ड्यूक बॉलचा वापर करण्यात आला होता.
आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांना ड्यूक चेंडू पाठवत आहोत जेणेकरून ते देखील यासह सराव करू शकतील. 21 मे पर्यंत आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी 4 संघ ठरतील. अशा परिस्थितीत जे खेळाडू मोकळे असतील, त्यांना आधी इंग्लंडला पाठवले जाईल, जेणेकरून ते तिथे स्वत:ची तयारी करू शकतील. कसोटीसाठी निवडलेल्या संघाबद्दल बोलायचे झाले तर चेतेश्वर पुजारा अजूनही इंग्लंडमध्ये असून तो काउंटी क्रिकेट खेळत आहे.
रोहित शर्मा, भारतीय कर्णधार
अंतिम सामन्यासाठीचे संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेजलवाड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिश, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.