राज्यात उद्या अंतिम टप्प्यातील मतदान!

देशात 49 तर राज्यात 13 मतदारसंघात मतदान

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवार, (दि. 21) मे रोजी पार पडणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील एकूण 13 मतदारसंघांसह देशातील 8 राज्यांतील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. शनिवारी सायंकाळी अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दरम्यान, सोमवारी या सर्व मतदारसंघातील मतदारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्‍चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 13 मतदारसंघांचा समावेश आहे.

लोकसभेच्या 8.95 कोटी मतदारांमध्ये 4.69 कोटी मतदान पुरूष तर 4.26 कोटी महिला आहे. 5 हजार 409 तृतियपंथी मतदारही हक्क बजावणार आहे. त्याचप्रमाणे वयवर्षे 85 हून अधिक मतदारांची संख्या 7.51 लाख एवढी आहे. शंभरहून अधिक वय असलेले मतदार जवळपास 25 हजार आहेत. निवडणूक आयोगाने मतदानासाठी 153 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे दोन हजार फ्लाईंग स्कॉड, 2105 सर्व्हिलन्स टीम, 881 व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, 502 व्हिडिओ विव्हिंग टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 216 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके, 565 आंतरराज्य चेकपोस्टही असतील.आठ राज्यांतील 94 हजार मतदान केंद्रांमध्ये 9 लाख 47 हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था, शेड, स्वच्छतागृह, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीजपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

कोण बाजी मारणार?
ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. त्यामुळं संजय दिना पाटील भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दक्षिण मध्य मुंबईत मातोश्रीच्या दोन आजी-माजी निष्ठावंतात थेट लढत आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळं यापैकी कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चुरशीच्या लढती :
* दक्षिण मुंबई : अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)
* दक्षिण मध्य मुंबई : अनिल देसाई (ठाकरे गट) विरुद्ध राहुल शेवाळे (शिंदे गट)
* उत्तर पश्‍चिम मुंबई : अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) विरुद्ध रवींद्र वायकर (शिंदे गट)
* उत्तर मुंबई : भूषण पाटील (काँग्रेस) विरुद्ध पियूष गोयल (भाजपा)
* उत्तर मध्य मुंबई : वर्षा गायकवाड (काँग्रेस) विरुद्ध उज्ज्वल निकम (भाजपा)
* ईशान्य मुंबई : संजय दिना पाटील (ठाकरे गट) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजपा)
* ठाणे : राजन विचारे (ठाकरे गट) विरुद्ध नरेश म्हस्के (शिंदे गट)
* कल्याण : वैशाली दरेकर (ठाकरे गट) विरुद्ध श्रीकांत शिंदे (शिंदे गट)
* भिवंडी : सुरेश म्हात्रे (मविआ) विरुद्ध कपिल पाटील (भाजपा) विरुद्ध निलेश सांबरे (अपक्ष)
* पालघर : भारती कामडी (ठाकरे गट) विरुद्ध डॉ. हेमंत सावरा (भाजपा) विरुद्ध राजेश पाटील (बहुजन विकास आघाडी)
* नाशिक : राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) विरुद्ध हेमंत गोडसे (शिंदे गट) विरुद्ध शांतीगिरी महाराज (अपक्ष)
* दिंडोरी : भास्कर भगरे (मविआ) विरुद्ध डॉ. भारती पवार (भाजपा)
* धुळे : शोभा बच्छाव (काँग्रेस) विरुद्ध डॉ. सुभाष भामरे (भाजपा)

पाचव्या टप्प्यात देशात किती मतदारसंघ?
उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्‍चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडणार आहे.
राज्यात कुठे मतदान?
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्‍चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात मतदान होणार आहे.
लक्षवेधी ठरणार्‍या लढती
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि स्मृती इराणी, भारती पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. राजनाथ सिंह लखनौमधून, स्मृती इराणी अमेठीतून, पीयूष गोयल मुंबई उत्तरमधून आणि ओमर अब्दुल्ला बारामुल्लामधून निवडणूक लढवत आहेत.
Exit mobile version