वाहन चालकांकडून वारंवार दंड चुकविण्याचा प्रयत्न
। अलिबाग । भारत रांजणकर ।
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गतवर्षी 2021 मध्ये जिल्हा वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली. त्यापैकी अवघी 50 लाख 37 हजार रुपयांची दंडवसुली रोखीत करण्यात आली असून, पावणे तीन कोटी दंड अद्याप थकीत आहे. दंड थकविणार्यांना जिल्हा वाहतूक शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. गतवर्षी 2021 मध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 1 लाख 53 हजार 387 वाहन चालकांवर ई चलनाद्वारे जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने 4 कोटी 30 लाख 30 हजार 700 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. त्यापैकी 20 हजार 331 वाहन चालकांनी 50 लाख 37 हजार 100 रुपयांचा दंड इमानेइतबारे वाहतूक शाखेकडे जमा केला. 197 वाहन चालकांवर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तब्बल 1 लाख 32 हजार 859 वाहन चालकांकडे तब्बल 3 कोटी 79 लाख 93 हजार 600 रुपयांचा दंड थकीत असून, त्यांना दंड तातडीने भरण्याची नोटीस जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात आली आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक शाखा असण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार, रायगड जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखा तयार करण्यात आली. शंभरहून अधिक वाहतूक पोलीस नाक्या-नाक्यावर तैनात केले जातात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेद्वारे राबविली जात आहे. मात्र, काही वाहन चालक दंड चुकविण्याचा वारंवार प्रयत्न करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यात वाहतूक पोलिसांसाठी ई चलन दंडाची कारवाई कारवाई सुरु केली. मोबाईल अॅपच्या माध्यमातून वाहनाचा फोटो काढून त्याची सविस्तर माहिती अॅपवर मिळवून कारवाई केली जाते. रायगड जिल्ह्यात हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, टीबल शीट असणे, अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणार्या 1 लाख 53 हजार 387 वाहन चालकांवर ई चलनाद्वारे कारवाई करण्यात आली. परंतु, या वाहन चालकांकडून अद्याप दंड देण्यात आला नाही. तब्बल 3 कोटी 79 लाख 93 हजार 600 रुपयांचा दंड थकीत असून, या थकीतदारांना ऑनलाईन स्वरुपात नोटीस बजावण्यात आली आहे.







