श्रीवर्धन येथील घटना
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन समुद्रकिनारा येथील शासकीय विश्रामगृहालगतच असलेल्या स्मशानभूमीत चितेच्या ठिणगीमुळे जवळच्या परिसरात आग लागण्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. श्रीवर्धन नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी वेळेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृहालगतच असलेल्या स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दुपारी एक ते दोन या वेळेस समुद्रकिनार्यावरील सोसाट्याच्या वार्यामुळे चितेवरील पेटते लाकडाचे निखारे आजूबाजूच्या परिसरात उडाले. या परिसरात पिंपळ, सुरूच्या झाडांची सुकून खाली पडलेली पाने, फांद्या तसेच सुकलेले गवत असल्यामुळे पेटते निखारे उडाल्याने क्षणार्धात आग लागली. वार्यामुळे आग पसरत जात असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास येतात श्रीवर्धन नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास कळवण्यात आले. अग्निशमन दल वेळेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आणि संभाव्य धोका टळला.
शनिवार, रविवार सलग सुट्ट्यांमुळे समुद्रकिनार्यावर आलेल्या पर्यटकांनी स्मशानभूमीलगतच आपली वाहने उभी केली होती. स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीशेजारी भेळपुरी विक्रेते, शहाळी विक्रेते सुट्टीच्या दिवशी आपापल्या हातगाड्या व्यवसायासाठी उभ्या करतात. वार्यामुळे आग सभोवती पसरत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. दुपारची वेळ असल्यामुळे व्यावसायिक हातगाड्या बंद करून घरी गेले होते, तसेच पर्यटक आपापल्या गाड्या उभ्या करून समुद्रकिनार्यावर फिरावयास गेले होते. आगीचे लोळ पसरत गेले असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पर्यटकांची मनमानी र.ना. राऊत शाळेपासून शासकीय विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर पर्यटकांनी आपली वाहने मिळेल त्या जागेवर उभी केली होती. नगरपरिषदेच्या वॉटर टेंडरला मिळेल त्या जागेतून घटनास्थळी हजर व्हावे लागले.