माजी उद्योगमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
| खोपोली | प्रतिनिधी |
पहल-नर्चरिंग लाईव्स ही एक सामाजिक संस्था आहे, जी तरुणांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. पहल ग्रामीण आणि आदिवासी गावात शाळा सोडलेल्या युवकांसोबत काम करते. पहल संस्थेने त्यांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा 21 ऑक्टोबर रोजी पहिला ‘दीक्षांत समारंभ’ पार पडला. यावेळी राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, रुबी मिलचे भरत शहा, सेठ लक्ष्मीचंद ट्रस्ट मुंबईचे योगेंन लाठीया, उमेश संघवी, संजीव लाठीया आणि भरत विरानी, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, माथेरानच्या मुख्यधिकारी सुरेखा भनगे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, संतोष जंगम आणि काही गावाचे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, 81 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यामध्ये नर्सिंग, इलेक्ट्रिशीयन, मोबाईल रिपेरिंग आणि टेलरिंग कोर्सचे विद्यार्थी होते. बहुतांश विद्यार्थी खालापूर, खरसुंडी, धामणी आणि सावरोली गावातील होते. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका विद्यार्थ्याला ‘व्हॅल्यू ऑफ कंपॅशन’ पुरस्कारासाठी ट्रॉफी प्रदान केली आणि त्यानंतर इतर नामवंत पाहुण्यांसह विद्यार्थ्यांना त्यांचे दीक्षांत प्रमाणपत्र प्रदान केले.

खरसुंडी गावातील विद्यार्थी प्रनोती कळमकर हिने आपल्या आयुष्याबद्दल मनोगत मांडले, मला खूप शिकायचं होते, परंतु घरची परिस्थिती चांगली नसल्याने मी पुढचे शिक्षण घेऊ शकले नाही, मी नर्सिंगचा कोर्स करून आज हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत आहे. विद्यार्थिनी संतोषी पवार यांनी सांगितले की, माझं शिक्षण कमी असल्याने लवकर लग्न झालं, त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. परंतु, लग्नानंतर 16 वर्षांनी मी इथे येऊन नर्सिंगचा कोर्स केला आणि आज मी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. यासोबत पहलने खरसुंडी आणि धामणी गावात परसबाग प्रकल्प राबविते, ज्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड केली जाते, परसबाग लागवड करणारे महिलांनी आपला भाजीपाल्याचा स्टॉल लावला होता.

संस्थेचे राज्य प्रमुख श्री. रोहिदास राठोड यांनी सांगितले की, पहल संस्थेचे उद्देश पूर्ण खालापूर तालुक्यात आणि जवळच्या तालुक्यातील युवकांना नवनवीन कोर्सच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून त्यांना ’आत्मनिर्भर’ बनवायचे आहे. खालापूर तालुक्यातील ग्रामीण लोकांमध्ये खूप उत्साह आहे, असे नवीन कार्य चालू करून ग्रामीण भागातील लोकांनी अभिनंदन व्यक्त केलं, असे कार्यक्रम पुढे वाढवण्याससाठी संस्थेचे प्रमुख अंकुश भारद्वाज यांनी सेठ धामजी लक्षमीचंद ट्रस्टचे आभार व्यक्त केले.
पहल-नर्चरिंग लाईव्स हे ग्रामीण भागातील तरुण मनांचे जीवन बदलून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी करत असलेले काम बघून अतिशय आनंद वाटत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात अशा परिवर्तनाची गरज आहे.
सुभाष देसाई, माजी उद्योगमंत्री