उदघाटनाविना धावली नवी मुंबईत पहिली मेट्रो

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईकरांना बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर सुरु झाली आहे. कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी दिले होते. त्यानुसार शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंधर स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. यावेळी सिडकोचे जॉईंट एमडी कैलाश शिंदे , नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. नवी मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये ही मेट्रो धावणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा तळोजा भागात राहणाऱ्या लोकांना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता प्रवाशांना सुखकर प्रवास करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, परंतु काही कारणास्तव सातत्याने हे उद्घाटन पुढे जात होतं. 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. पण त्यानंतरही ही मेट्रो सुरु होण्याकरिता काही केल्या मुहूर्त लागत नव्हता.

तळोजा-पेंधर वरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. मेट्रोने येणाऱ्या प्रवाशांना बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून हार्बर मार्गे मुंबई , ठाणे येथे जाणे सोईस्कर होणार आहे. सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. मेट्रो 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे.

नवी मुंबई मेट्रोची वैशिष्ट्ये काय?
अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत

Exit mobile version