नेरळ रेल्वे स्थानकातील स्कायवॉकचा पहिला खांब उभा राहिला

| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या मुख्य वाहिनीवरील नेरळ रेल्वे स्थानकात स्कायवॉक बनविला जात आहे. या स्काय वॉकच्या पहिल्या खांबाची उभारणी स्थानकात करण्यात आली. फलाट एकवर हा स्काय वॉक उभारला जात आहे. त्याची एक बाजू थेट नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या रेल्वेपार्किंगपर्यंत राहणार आहे.

नेरळ स्थानकात कर्जत दिशेकडील फलाट एकवर मुंबईकडून येणाऱ्या उपनगरीय लोकलमधील प्रवासी उतरत असतात. तसेच या स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळाकडे मिनीट्रेन जाते. त्यामुळे जागतिक दर्जाच्या माथेरान या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार म्हणून नेरळ रेल्वे स्थानक ओळखले जाते.

परिणामी मुंबई येथून उपनगरीय लोकलने येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नेरळ स्थानकाचा मेक ओव्हर केला जात आहे. लोकांची वर्दळ या स्थानकात वाढली आहे. प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर पडताना वाहनांच्या गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी फलाट एकमधून बाहेर पाडण्यासाठी स्कायवॉक बनविण्याचा निर्णय विद्यमान खासदारांनी घेतला होता.

सध्या नेरळ रेल्वे स्थानक स्कायवॉकसाठी गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. या स्कायवॉकसाठी आवश्यक असलेला लोखंडी खांब उभारण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या लोखंडी खांब उभारण्याचे काम मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पूजा करून सुरु केले. यासाठी मोठ्या क्रेनची मदत घेतली जात आहे.

Exit mobile version