पहिल्याच पावसाने दाणादाण


मुंबई तुंबली; कोकणात ढगफुटीचा धोका

मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.

मुंबईच्या पश्‍चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्‍वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोकणात ढगफुटीचा धोका
कोकणात ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.

मुंबईत रेड अलर्ट जारी
मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररुप दाखवत असतानाच आता मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version