ओल्या काजूगराचा पहिला हंगाम सरला

आवक कमी किंमत वाढली खवय्यांचा हिरमोड
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
जिल्ह्यात ओल्या काजुगरांचा हंगाम साधारण फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे. सध्या हा पहिला हंगाम सरत चालला असल्याने बाजारात अचानक काजुगराची आवक कमी झाली आहे. परिणामी किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे खवय्यांचा हिरमोड झाला आहे. फेब्रुवारीत पहिल्या हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात 350 ते 250 रुपये शेकड्याने ओले काजूगर भेटत होते. मात्र त्यानंतर उत्पादन वाढल्याने आवक जास्त होऊ लागली. परिणामी साधारण मार्च ते एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत ओले काजुगराची किंमत उतरून 150 ते 200 रुपये शेकडा व 10 रुपये वाट्याने ओले काजूगर सर्वत्र मिळत होते. मात्र आता ओले काजूगराचा पहिला हंगाम संपला आहे. उत्पादन घटले व आवक कमी झाली परिणामी पुन्हा एकदा ओले काजूगर महागले असून 250 ते 300 रुपये शेकडा आणि 20 रुपये वाट्याने मिळत आहेत. हंगाम संपल्याने व उत्पादन घटल्याने सध्या फार कमी प्रमाणात बाजारात काजूगर विक्रीसाठी येत आहेत. मात्र काही दिवसांनी ओल्या काजुगराचा दुसरा हंगाम सुरू होईल व पुन्हा एकदा मुबलक काजूगर उपलब्ध होतील व किंमती पुन्हा खाली येतील. निसर्गाने साथ दिल्यास हा हंगाम साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यापर्यत चालेल असे लक्ष्मी पवार या काजूगर विक्री करणार्‍या महिलेने सांगितले.

काजूगराचे चविष्ट पदार्थ
चविष्ट ओले काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्या जातात. काजुगराचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. पुलाव व बिर्याणी देखिल केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकुन सुद्धा काजूगर खाल्ले जातात. असे हे काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.

घरात सर्वांना ओले काजूगर खूप आवडतात. यंदा पहिला हंगाम लवकर संपला. शिवाय भाव देखील अधिक होते. – ओमकार जाधव, रवाळजे-माणगाव

Exit mobile version