। मुरूड । वार्ताहर ।
राज्यभरातील शाळा दीर्घ सुट्टीनंतर सुरू होत आहेत. शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यात सर्वत्र केले जात आहे. शाळा ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पर्यायाने देशाला आकार देते. विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. त्यांना शिकण्यासाठी शासनातर्फे आपण मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश व शूज तसेच अन्य योजना कार्यान्वित करत आहोत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस पूरक उपक्रमाचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांचं आजचं शाळेतलं पहिलं पाऊल, प्रगत देश घडवेल, असे प्रतिपादन मुरूड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी यांनी शाळाभेटी दरम्यान केले. गट शिक्षण अधिकारी गवळी यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मजगाव शाळेस भेट दिली होती.यावेळी ते बोलत होते.
यावेळी गटशिक्षण अधिकारी गवळी यांनी विविध स्पर्धा परीक्षेत उत्तम कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कारही केला. तसेच शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देवून नव्या शैक्षणिक वर्षातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक हेमकांत गोयजी, मनिषा वाघरे, प्रमिला फुंदे, चेतन चव्हाण, हर्षा नांदगावकर, रंजिता केमकर व साधनव्यक्ती महेश भगत, चेतन पाटील , पुकळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.