‘प्रथमा’ कासवाचा 330 किमीचा प्रवास

गुजरात किनार्‍याजवळ पोचले !
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी प्रथमा ने गुजरातचा किनारा गाठला आहे. या कासवाने सर्वाधिक 330 किलोमीटरचा प्रवास केला आहे; तर सावनी आणि वनश्री यांनी रेवा कासवाच्या दिशेने आणखी दक्षिणेकडे म्हणजेच कर्नाटकच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. रेवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून, ते कारवारपासून 40, तर मंगळूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे.

कांदळवन प्रतिष्ठानचा उपक्रम
कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करून अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान कडून पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांत पाच कासवे सोडण्यात आली. त्यातील लक्ष्मी हे कासव महिन्याभरातच संपर्काबाहेर गेले; तर उर्वरित चार कासवांची सद्यःस्थितीवर कांदळवन विभागाचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे लक्ष ठेवून आहेत.
वेळास, आंजर्ले, गुहागर या किनार्‍यांवर अंडी घालून समुद्रात जाणार्‍या कासवांना टॅगिंग केले असून, त्यांना नावेही देण्यात दिली आहेत. यातील ङ्गप्रथमाफ नामक कासवाचा प्रवास पुढेच सुरू असून, ते गुजरातच्या किनार्‍यावर पोचले आहेत. आतापर्यंत वेळासपासून प्रथमाने 330 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. ते सध्या दीव किनार्‍यापासून 65 किमी अंतरावर आहे. सावनी हे सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुमारे 90 किमी सरळ रेषेत प्रवास करत आहे. रेवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून आणि गोवा ओलांडून ती कर्नाटकच्या पाण्यात शिरली आहे. सध्या कर्नाटकातील कारवारपासून 40 किमी अंतरावर आहे. वनश्री किनार्‍यानेच दक्षिणेकडे जात असून, ती सध्या आंबोळगड किनार्‍यापासून सुमारे 25 किमी सरळ रेषेत आहे.


टॅगिंग केलेल्या कासवांचा प्रवास सुरू आहे. त्यांच्याविषयीची निरीक्षणे केली जात आहेत. वर्षभरानंतर त्यांच्या एकूण प्रवासातील घटनांवरून निरीक्षणे नोंदवता येतील.

Exit mobile version